आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात काय घडले? कोणते शेअर्स घसरले, कोणते वधारले; वाचा... सविस्तर!
चालू आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात प्रचंड अस्थिरता दिसून आली आहे. खराब जागतिक संकेतांमुळे भारतीय बाजार सकाळी घसरणीसह सुरु झाला. परंतु, आयटी आणि बँकिंग समभागांमध्ये झालेल्या खरेदीमुळे खालच्या स्तरावरून मजबूत रिकव्हरी झाली आणि सेन्सेक्स खालच्या स्तरावरून 1100 अंकांनी वाढला तर निफ्टीमध्येही वाढ झाली. मात्र, असे असले तरीही शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही फ्लॅट स्थितीत बंद झाले. ज्यामुळे सध्या शेअर बाजारात कभी खुशी कभी गमचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सेन्सेक्स, निफ्टी फ्लॅट स्थितीत बंद
मुंबई शेअर बाजाराचा (बीएसई) सेन्सेक्स आज (ता.११) 9.83 अंकांच्या वाढीसह 79,496 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टी 7 अंकांच्या घसरणीसह 24,141 अंकांवर बंद झाला आहे. अर्थात आज शेअर बाजारात काहीशी फ्लॅट परिस्थिती आढळून आली आहे.
(फोटो सौजन्य – iStock)
दरम्यान, आज शेअर बाजार फ्लॅट स्थितीत बंद झाल्याने मिड-कॅप आणि स्मॉल-कॅप समभागांच्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सूचीबद्ध कंपन्यांच्या शेअर्सचे बाजार भांडवल 442.53 लाख कोटी रुपयांवर बंद झाले आहे. जे मागील सत्रात 444.35 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या सत्रात गुंतवणूकदारांचे 1.82 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
कोणते शेअर्स घसरले? कोणते वधारले?
मुंबई शेअर बाजाराच्या (बीएसई) सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 12 शेअर वाढीसह तर 18 शेअर घसरणीसह बंद झाले. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (एनएसई) निफ्टीच्या 50 शेअर्सपैकी 20 वाढीसह आणि 30 शेअर्स तोट्यासह बंद झाले.
दरम्यान, आज तेजीत राहिलेल्या शेअर्समध्ये पॉवर ग्रिड 4.22 टक्के, एचसीएल टेक 1.60 टक्के, इन्फोसिस 1.58 टक्के, टेक महिंद्रा 1.24 टक्के, टीसीएस 1.21 टक्के, मारुती सुझुकी 0.86 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.78 टक्के, एचडीएफसी बँक 0.69 टक्के, टायटन 0.69 टक्के वधारून बंद झाले आहे. तर सर्वाधिक प्रभावित शेअर्समध्ये एशियन पेंट्स 8.18 टक्के, टाटा स्टील 1.76 टक्के, बजाज फायनान्स 1.73 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 1.65 टक्के, अदानी पोर्ट्स 1.17 टक्क्यांनी घसरले आहेत.
केवळ बँकिंग, आयटी क्षेत्रांच्या समभागांमध्ये वाढ
आजच्या व्यवहारात बँकिंग आणि आयटी क्षेत्रांच्या समभागांमध्ये वाढ झाली आहे. परंतु याशिवाय इतर सर्व क्षेत्रातील समभाग घसरणीसह बंद झाले आहे. एफएमसीजी, मेटल्स, आयटी, फार्मा, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर समभाग घसरले आहेत. आजच्या व्यवहारात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही घसरण दिसून आली आहे.
(टीप : शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. वरती दिलेली माहिती माहितीस्तव देण्यात आली आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा यामागील उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)