FDI Investment in India: भारताचा जीडीपी ८% वाढतेय, तरी परकीय गुंतवणूक का बाहेर पडतेय? (फोटो सौजन्य-X)
FDI Investment in India: परकीय गुंतवणूकदारांनी २०२५ मध्ये भारतीय बाजारातून १८ अब्ज डॉलर (सुमारे १ लाख ५८ हजार कोटी रुपये) काढून घेतले आहेत. २०२३-२४ पासून परकीय थेट गुंतवणूक (FDI) सातत्याने घटत चालली असून ही बाब चिंतेची आहे. भारताची जीडीपी वाढ सरासरी वार्षिक ८ टक्क्यांच्या दराने होत असतानाही परकीय गुंतवणूक का येत नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. या दराने वाढणा-या अर्थव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवरही परकीय पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) दृष्टिकोन नकारात्मक किंवा उदासीन का राहतो, की ते इक्विटी विकून आपली गुंतवणूक परत घेत आहेत. परकीय गुंतवणूकदार भारतात नवी भांडवली गुंतवणूक करण्याऐवजी येथून पैसा काढण्याकडे वळले आहेत. दक्षिण कोरियाची वाहननिर्माता कंपनी हुंडई मोटर्स व एलजी इलेक्ट्रॉनिक्स, तसेच चीनची मोठी होम अप्लायन्स कंपनी हायर यांनी त्यांच्या भारतीय शाखांसाठी ४९ टक्के हिस्सा आयपीओच्या माध्यमातून उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा: India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल
एकीकडे परकीय गुंतवणूकदार माघार घेत असताना, दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदार एसआयपी (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लान) च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात सातत्याने गुंतवणूक करत आहेत. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत परकीय गुंतवणूकदारांनी १,४३,६७५ कोटी रुपयांची इक्विटी विक्री केली, तर त्याच कालावधीत भारतीय गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात ३,०३,९७८ कोटी रुपये गुंतवले. परकीय गुंतवणूकदारांचा हा दृष्टिकोन यासाठी आहे की, जागतिक स्तरावर व्याजदर तुलनेने वाढले आहेत. अमेरिकेच्या १० वर्षांच्या बाँडवर ४.१ ते ४.२ टक्के, तर जपानमध्ये २ ते २.१ टक्क्यांपर्यंत परतावा मिळत आहे. शेअर बाजारातील जोखमीच्या तुलनेत हे अधिक सुरक्षित गुंतवणूक पर्याय मानले जात आहेत. त्यामुळे भारतीय इक्विटी विकून हा पैसा नॉन-इक्विटी साधनांमध्ये वळवला जात आहे.
हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करताय? जाणून घ्या आजचे दर
अमेरिका, चीन, तैवान आणि उत्तर कोरियाच्या इक्विटी बाजारांना एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) मुळे चालना मिळाली आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत डिजिटल प्लॅटफॉर्म, रिन्यूएबल्स, आयटी आणि फायनान्शियल सेवांची मोठी भूमिका आहे. हा सकारात्मक पैलू परकीय व देशांतर्गत दोन्ही गुंतवणूकदारांनी समजून घेणे ओवश्यक आहे. गुंतवणुकीमुळे रोजगारनिर्मिती आणि तांत्रिक विकासाला चालना मिळते. याशिवाय, भारताला आपल्या चालू खात्याच्या तुटीची भरपाई करण्यासाठीही परकीय भांडवलाची आवश्यकता आहे.






