फोटो सौजन्य - Social Media
आजच्या काळात अनेक तरुण, महिला आणि शेतकरी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा बाळगतात. मात्र अनेकदा भांडवलाची कमतरता आणि योग्य माहिती नसल्यामुळे त्यांची ही इच्छा अपूर्ण राहते. या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून काही विशेष योजना राबवण्यात आल्या आहेत, ज्यांच्या साहाय्याने कमी भांडवलातही व्यवसाय सुरू करता येतो. या योजना लोन, सबसिडी आणि प्रशिक्षणाच्या स्वरूपात मदत देतात. प्रधानमंत्री मुद्रा योजना ही अशाच प्रकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत शिशु, किशोर आणि तरुण अशा तीन टप्प्यांमध्ये कर्ज दिले जाते. यामध्ये ५० हजारांपासून १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते आणि यासाठी कोणतीही हमी लागते नाही. किराणा दुकान, शिवणकाम, मसाला युनिट, सायकल रिपेअरिंग यांसारखे लघुउद्योग सुरू करणाऱ्यांसाठी ही योजना फायदेशीर ठरते.
राष्ट्रीय पशुधन मिशन योजना देखील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे. या योजनेद्वारे डेअरी फार्म, बकरी पालन, कुक्कुटपालन यांसाठी कर्जासोबत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. महिलांना आणि स्वयं सहायता गटांना विशेष प्राधान्य दिले जाते. यामुळे पशुपालनाद्वारे उत्पन्नाचे स्थिर साधन निर्माण करता येते.
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम ही आणखी एक उपयुक्त योजना आहे, जी ग्रामीण व निमशहरी भागात उद्योजकतेला चालना देते. टेलरिंग युनिट, अगरबत्ती बनवणे, फर्निचर वर्कशॉप, आटा चक्की यांसारखे व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून १० ते २५ लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. यावर २५ ते ३५ टक्क्यांपर्यंत अनुदानही दिले जाते.
जर तुमच्याकडे एखादी नाविन्यपूर्ण आणि उपयोगी कल्पना असेल, तर स्टार्टअप इंडिया योजना तुमच्यासाठी उत्तम संधी ठरू शकते. या योजनेअंतर्गत तीन वर्षांपर्यंत करमाफी, गुंतवणूकदारांशी संपर्क आणि सरकारी प्रशिक्षण यांसारख्या सुविधा दिल्या जातात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनी पाच वर्षांपेक्षा जुनी नसावी आणि वार्षिक उलाढाल १०० कोटींपेक्षा कमी असावी. या सर्व योजनांमुळे आता व्यवसाय सुरू करणे अवघड राहिलेले नाही. योग्य योजना निवडा, माहिती मिळवा आणि तुमचे उद्योजकीय स्वप्न साकार करण्याची सुरुवात करा.