अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती कितीये? भारतात देखील केलीये गुंतवणूक! वाचा... सविस्तर
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकूण संपत्ती किती? असा प्रश्न अगदी सर्वच भारतीयांना पडतो. अनेकांना याबाबत जाणून घेण्याची इच्छा असते. मात्र, मोदी यांच्या नावावर ना घर, ना कार असल्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तर त्यांंच्याकडे केवळ तीन कोटींच्या आसपास इतकीच संपत्ती असल्याचे आयोगाला सांगितले आहे.
तर याउलट अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांच्याविरुद्ध निर्णायक विजय मिळवला आहे. ट्रम्प यांची गणना अमेरिकेतील सर्वात श्रीमंत नेत्यांमध्ये केली जाते. ट्रम्प यांचा व्यवसाय रिअल इस्टेटपासून मीडिया तंत्रज्ञानापर्यंत विस्तारलेला आहे. त्यांनी भारतातही गुंतवणूक केली आहे. याच पार्श्वभुमीवर आज आपण ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीबाबत जाणून घेणार आहोत…
डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ मध्ये सर्वप्रथम राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यावेळी त्यांची संपत्ती ही 4.5 अब्ज डॉलर इतकी होती. मात्र, असे असले तरी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्विकारल्यानंतर, त्यांच्या एकुण संपत्तीत मोठी घसरण झाली. 2020 मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही 2.1 अब्ज डॉलर इतकी राहिली. मात्र, त्यांनी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार सोडल्यानंतर, त्यांच्या संपत्तीत पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून आली.
डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती 2022 मध्ये 3 अब्ज डॉलर इतकी होती. तर सध्याच्या घडीला ट्रम्प यांची 7 अब्ज डॉलरहून अधिक आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, नोव्हेंबर २०२४ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची एकूण संपत्ती ७.७ अब्ज डॉलर इतकी होती. भारतीय रुपयामध्ये विचार करता, ट्रम्प यांची संपत्ती ही सुमारे ६४,८५५ कोटी रुपये इतकी आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण संपत्तीमध्ये ट्रम्प मीडिया आणि टेक्नॉलॉजी ग्रुपचा सर्वात मोठा वाटा आहे. निवडणुकीच्या दिवशी म्हणजे 5 नोव्हेंबरला ट्रम्प मीडियाच्या शेअर्समध्ये सुमारे 15 टक्क्यांनी उसळी दिसून आली आहे. ते गोल्फ क्लब, रिसॉर्ट्स आणि बंगले यांनी भरलेले आहेत. त्यांचे 19 गोल्फ कोर्स आहेत. अमेरिकेच्या रिअल इस्टेट क्षेत्रातही ट्रम्प यांचा प्रभाव दिसून येत आहे.
ट्रम्प यांना रिअल इस्टेट व्यवसायाचा वारसा मिळाला आहे. त्यांचे वडील फ्रेड ट्रम्प यांची न्यूयॉर्कमधील सर्वात यशस्वी रिअल इस्टेट व्यावसायिकांमध्ये गणना होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी 1971 मध्ये वडिलांकडून मिळालेला 413 दशलक्ष डॉलर व्यवसाय ताब्यात घेतला. आणि त्याचा वेगाने विस्तार केला. त्यांनी अनेक आलिशान इमारती बांधल्या. यामध्ये ट्रम्प पॅलेस, ट्रम्प वर्ल्ड टॉवर, ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेल आणि रिसॉर्ट यांचा समावेश आहे. जगातील सर्व मोठ्या शहरांबरोबरच, भारतातील मुंबईतही वारसा हक्काने त्यांची संपत्ती आहे.