अमेरिकेत ट्रम्प सरकार येताच भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी; 937 अंकांनी वधारला सेन्सेक्स!
गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीची मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायाला मिळत आहे. अशातच आता अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल समोर आला असून, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांना चितपट केले आहे. मात्र, ट्रम्प यांच्यावर गुलाल उघळला जाताच भारतीय शेअर बाजाराने देखील मोठी उसळी घेतली आहे.
शेअर बाजारात आनंदीआनंद
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्यानंतर, इकडे शेअर बाजारात आनंदीआनंद पाहायला मिळत आहे. आज दुपारी 2 वाजेपर्यंत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९३७.५० अंकांनी वाढून, ८०,४१४.१३ अंकांवर स्थिरावल्याचे पाहायला मिळाले. तर आशियाई बाजारांमध्येही उसळी दिसून आली. त्याचवेळी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 200 हून अधिक अंकांची वाढ दर्शवत, 24400 चा टप्पा पार केला आहे.
बाजाराची तेजीत सुरुवात
बुधवारी (ता.६) शेअर बाजार तेजीसह उघडला. मंगळवारी (ता.५) सेन्सेक्स ७९,७७१.८२ अंकांवर उघडला होता. तर ७९,४७६.६३ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टीही मंगळवारी (ता.५) 24,308.75 अंकांवर उघडला होता. जो शेअर बाजार बंद होताना २४,२१३.३० अंकांपर्यंत खाली आला होता. अर्थात आज मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ९३७.५० अंकांनी वाढून, ८०,४१४.१३ अंकांपर्यंत वाढला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 200 हून अधिक अंकांची उसळी घेत 24400 चा टप्पा पार केला आहे.
या समभागांमध्ये झालीये वाढ
आज शेअर बाजारात अनेक शेअर्सने दमदार कामगिरी केली आहे. सेन्सेक्स पॅकमध्ये एचसीएल टेक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, मारुती, सन फार्मा आणि ॲक्सिस बँक हे शेअर आघाडीवर होते. तर टायटन, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, टाटा मोटर्स आणि एसबीआय सर्वाधिक घसरले आहेत. आदिनाथ एक्झिम, तनवाला केम, एआय चॅम्पडनी, एमेसर बायोटेक, ओमांश एंटरप्रायझेस, किरण व्यापारी, हिंदुस्थान हार्डी, जनबरकट फार्मा इत्यादींची सर्वाधिक वाढ झालेली आहे.
आशियाई बाजारपेठेतही वाढ
अमेरिकेत पुन्हा एकदा ट्रम्प सरकार आल्याने, केवळ भारतीय शेअर बाजारालाच पंख फुटले नाहीत तर आशियाई बाजारांमध्येही वाढ दिसून आली आहे. चीन, जपान, तैवान, पाकिस्तान आदी देशांच्या शेअर बाजारातही वाढ दिसून आली. मात्र, चीनच्या शेअर बाजारात फारशी वाढ झाली नाही. शांघाय स्टॉक एक्सचेंजमध्ये एक टक्काही वाढ झालेली नाही.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)