अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव(फोटो-सोशल मीडिया)
Suryakumar Yadav’s commentary on Abhishek Sharma : टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर ८ सामन्यांची सुरुवात झाली आहे. पहिला सुपर ८ सामना आज कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दूसरा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रविवारी, २२ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे. हा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ या स्पर्धेत प्रभावी कामगिरी करत आहे. केवळ, संघाला अभिषेक शर्माच्या फॉर्मची काळजी आहे. सलामीवीर अभिषेक शर्माचा फॉर्मवर कर्णधार सूर्यकुमार यादवने भाष्य केले आहे.
हेही वाचा : IND vs SA, T20 World Cup 2026 : अहमदाबादमध्ये कोण ठरणार बॉस? फलंदाज की गोलंदाज? वाचा खेळपट्टीचा अहवाल
भारतीय संघाने ग्रुप (टी२० विश्वचषक २०२६ ) स्टेजमध्ये शानदार कामगिरी केली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमधील खेळाडूंनी जबाबदारीने आपली भूमिका पार पाडली आहे. तथापि, सलामीच्या स्लॉटमध्ये अभिषेक शर्मा लागोपाठ तीन सामन्यात शून्य बाद होणे चर्चेचा विषय बनला आहे. तो या स्पर्धेत पहिल्यांदाच खेळत आहे आणि आतापर्यंतच्या तीन डावांमध्ये त्याला खातेही उघडता आले नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात देखील तो एकही धाव न करता परतला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसून येत होती.
सुपर ८ सामन्याच्या एक दिवस आधी, कर्णधार सूर्यकुमार यादवला पत्रकार परिषदेत अभिषेकच्या फॉर्मबद्दल विचारण्यात आले. तेव्हा सूर्याने आत्मविश्वासाने उत्तर दिले. अभिषेकबद्दल काळजी करणाऱ्यांबद्दल त्यांना काळजी वाटते असे सूर्या म्हणाला. खरी चिंता पुढील सामना होणाऱ्या संघांबद्दल असायला पाहिजे. सूर्या असा देखील म्हणाला की, अभिषेकने गेल्या वर्षी शानदार कामगिरी बजावली होती आणि आता त्याला पाठिंबा देण्याची जबाबदारी संघाची आहे. कर्णधाराच्या विधानावरून स्पष्ट होते की संघ व्यवस्थापन या तरुण फलंदाजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे.
अभिषेक शर्माच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय विक्रमाबद्दल सांगायचे झाले तर त्याने या संघाविरुद्ध ८ सामन्यात २५ च्या सरासरीने २०० धावा फटकावल्या आहेत. त्याच्या नावावर एक अर्धशतक देखील जमा आहे. उल्लेखनीय म्हणजे, त्याचा स्ट्राइक रेट १७३.९१ आहे, जो त्याची आक्रमक शैलीचे दर्शन घडवतो.
भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अक्षर पटेल, संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, इशान किशन, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, रिंकू सिंग, मोहम्मद सिराज.
दक्षिण आफ्रिका संघ: एडेन मार्कराम (कर्णधार), क्विंटन डी कॉक, डेवाल्ड ब्रुविस, डेव्हिड मिलर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, क्वेना म्फाका, लुंगी एनगिडी, जेसन स्मिथ, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, अँरिच नॉर्टजे, ट्रिस्टन स्टब्स, रायन रिकेल्टन.






