ही एक चूक आणि Zomato च्या मालकाला शाकाहारी लोकांची मागावी लागली माफी
आज कोणालाही घरबसल्या जेवण मागवायचे असेल तर आपसूकच अनेक जण आपल्या मोबाइलमधील झोमॅटो अॅप वापरताना दिसतात. एवढेच काय तर ‘जेवण नाही आहे का मग झोमॅटो कर’ असे वाक्य हल्ली ऐकायला मिळते. आज झोमॅटो घरबसल्या फूड डिलिव्हरी करत आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीच्या सीईओ दीपिंदर गोयल यांनी चक्क झोमॅटो डिलिव्हरी बॉय बनून फूड्सची डिलिव्हरी केली होती. तसेच या फूड डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते, याबाबतही त्यांना अनेक गोष्टी समजल्या.
दीपिंदर गोयल यांनी या डिलिव्हरी बॉय बनण्याच्या प्रवासाला सोशल मीडियावर देखील पोस्ट केले. यानंतर अनेकांनी त्यांचे कौतुक देखील केले. पण आता याच झोमॅटोच्या सीईओला चक्क माफी मागावी लागली आहे. नेमके घडले काय? चला जाणून घेऊया.
‘सीझनही जवळ, गुंतवणूकही कमी’; लवकर सुरु करा ‘हा’ व्यवसाय, ‘कमाई होईल अफाट, पैशांनी भरेल कपाट’
ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो अलीकडेच त्यांच्या सीईओ दीपिंदर गोयल यांनी एका ग्राहकाची माफी मागितल्यामुळे चर्चेत आली आहे. खरंतर दीपिंदर गोयल यांनी त्यांच्या ग्राहकांची माफी मागितली आहे कारण झोमॅटोने शाकाहारी जेवणावर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा वादग्रस्त निर्णय घेतला होता. झोमॅटोच्या बिलात व्हेजिटेरियन हँडलिंग चार्ज ‘veg mode enablement fee’ बद्दल एका ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर ही समस्या उघडकीस आली.
१७ जानेवारी २०२५ रोजी, झोमॅटोच्या एका ग्राहकाने सोशल मीडियावर त्याच्या जेवणाच्या बिलाचा एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये शाकाहारी जेवणासाठी अतिरिक्त शुल्क आकारल्याचा उल्लेख आहे. या पोस्टमध्ये रोहित रंजन नावाच्या एका ग्राहकाने लिहिले की, भारतात शाकाहारी असणे हा एक शाप बनला आहे. आपण ग्रीन अँड हेल्दीपासून ग्रीन अँड एक्सपेन्सिव्ह झालो आहोत. ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि अनेकांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.
वाद वाढत असताना, झोमॅटोचे मालक आणि सीईओ दीपिंदर गोयल यांनी लगेच प्रतिक्रिया दिली आणि सोशल मीडियावर माफी मागितली. ते म्हणाले की आमच्याकडून जे घडले ते चुकीचे होते. आम्ही ही समस्या गांभीर्याने घेत आहोत आणि ती त्वरित सोडवत आहोत. गोयल म्हणाले की, कंपनी आपल्या ग्राहकांच्या भावनांचा आदर करते आणि भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी पावले उचलेल.
रोहित रंजनची पोस्ट इतक्या वेगाने व्हायरल झाली की त्यावर अनेक प्रकारच्या कमेंट आल्या. अनेक वापरकर्त्यांनी लिहिले की शाकाहारी पर्यायांसाठी अतिरिक्त शुल्क आकारणे हे केवळ अन्याय्यच नाही तर भेदभावपूर्ण दृष्टिकोन देखील दर्शवते. एका ग्राहकाने लिहिले, “आता आपल्याला आमच्या अन्नावरही टॅक्स भरावा लागेल का? हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे.”