आता शिळफाट्याची वाहतूक कोंडी फुटणार! मेट्रो १२ च्या विस्तारीकरणाची घोषणा
कल्याण लोकसभा मतदारसंघातील वाहतूक आणि दळणवळणाच्या साधनांमध्ये गेल्या काही वर्षात कमालीची सुधारणा झाली आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून कल्याण लोकसभा मतदारसंघात नियोजनपूर्ण प्रकल्पांची आखणी करण्यात आली. त्यामुळे मतदारसंघातील वाहतुकीचा वेग वाढला आहे. मेट्रो, रेल्वे, रस्ते, उड्डाणपूल, उन्नत मार्ग, रेल्वे पूल, रस्त्याचे रूंदीकरण अशी अनेक ऐतिहासिक प्रकल्प पूर्ण झाले आणि अनेक सुरूही आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक प्रकल्पांना गती मिळाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून नुकताच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) २०२६-२७ वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध प्रकल्पांसाठी ४ हजार ८९७.१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतला. यावेळी त्यांनी पलावा उड्डाणपूल, मेट्रो १२, तिसरा पत्री पूल, वालधुनी नदी लगत विठ्ठलवाडी स्थानक ते कल्याण अहिल्यानगर महामार्गापर्यंतचा उन्नत मार्ग आणि कल्याण रिंग रोड या प्रकल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करून तो नागरिकांसाठी खुला करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी बोलताना त्यांनी कल्याण ते तळोजा मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाची घोषणा केली. कल्याण ते तळोजा या मेट्रो १२ मार्गाच्या विस्तारीकरणाचा महत्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. या त्यामुळे मेट्रो १२ हा मार्ग दोन भागातून जाणार आहे. नव्या विस्तारीत मार्गामध्ये कल्याण शीळफाटा रस्त्याच्या समांतर मार्गिका नेण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विस्तारीत डोंबिवलीसह, मानपाडा, कटाई नाका, ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव या भागातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. या नव्या मार्गामुळे शिळफाटा रस्त्यावरील वाहनांची संख्याही कमी होईल. कळवा, दिवा, मुंब्रा भागात जाणारी ही पहिली मेट्रो ठरणार असून भविष्यात मेट्रो १४ सोबत इंटीग्रेशन झाल्याने त्याचा फायदा थेट नवी मुंबई, कांजुरमार्ग ते मुंबईला जाण्यासाठी होईल. त्यामुळे या मेट्रोचे महत्व वाढलेले आहे, असेही खासदार डॉ. शिंदे म्हणाले.
ही विस्तारित मेट्रो लाईन कल्याण–मानपाडा–कटाई नाका–कल्याण फाटा मार्गे विद्यमान मेट्रो लाईन–12 शी खुतारी गावाजवळ एकत्रित होऊन तळोजा रेल्वे स्थानक अर्थात अमनदूत पर्यंत पोहोचेल.
कटाई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो १४ (कांजुरमार्ग ते बदलापूर ) बरोबर कॉमन ट्रॅक व स्टेशन शेअरिंग प्रस्तावित आहे.
निलजे डेपो कनेक्शन, मेट्रो १४ इंटिग्रेशन आणि नॅशनल हायस्पीड रेल्वेच्या ठाणे–बुलेट ट्रेन स्थानकाशी या मेट्रो मार्गाने जोडणी केली जाणार आहे.
या सुधारित मार्गिकेची एकूण लांबी १८.४ किलोमीटर आहे. त्यातील सध्या सुमारे १०.५ किलोमीटरवर बांधकाम प्रगतीपथावर आहे.
या मार्गात एकूण १२ उन्नत (एलिव्हेटेड) स्थानके प्रस्तावित आहे.
प्रमुख स्थानके: मानपाडा, काटई नाका, कल्याण ग्रोथ सेंटर, देसाई नाका, पडलेगाव, कल्याण फाटा, गोठेघर, दहिसार मोरी, दहिसारगाव, किरावली गाव, रोहिंजण, खुतारी गाव.
या प्रकल्पासाठी प्रिकास्ट ट्वीन यू टाईप गर्डर प्रणाली जी सिंगल पिअरवर आधारित असेल ती वापरली जाणार आहे.
मेट्रो आणि प्रस्तावित कल्याण–राजनोली फ्लायओव्हर साठी एकत्रित खांब (Integrated single pier) संकल्पना वापरली जाणार आहे.(फ्लायओव्हरचा सुपर-स्ट्रक्चर वगळून).
कल्याण शीळफाटा रस्त्यावरील कल्याण फाटा (शिळफाटा) ते भिवंडीजवळी आग्रा महामार्गावरील राजनोली पर्यंतचा प्रवास आता सुखकर होणार आहे. या ठिकाणी डबर डेकर उन्नत मार्ग उभारणीसाठी एमएमआरडीएने मंजुरी दिली आहे. या चार पदरी डबल डेकर उन्नत मार्गावरून एकाच वेळी मेट्रो आणि रस्ते वाहतूक होणार आहे. कोणत्याही कोंडीशिवाय, शहराच्या मध्यवर्ती भागातले वर्दळीचे चौक टाळून या मार्गाने शिळफाटा ते थेट भिवंडी असा प्रवास करता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजीत खर्च ५ हजार ९०९.२१ कोटी इतका असून त्याला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या उन्नत मार्गाची एकूण लांबी १९.४० किलोमीटर इतकी आहे. याची सुरूवात कल्याणफाटा (शिलफाटा जंक्शन) पासून होऊन कटई नाका, पत्री पूल, गोविंदवाडी बायपास मार्गे भिवंडीतील राजनोली जंक्शन येथे समाप्ती होईल.
या मार्गाचा समावेश ठाणे – भिवंडी – कल्याण मेट्रो मार्ग क्रमांक ५, कल्याण – तळोजा मेट्रो मार्ग १२ या दोघांशी होईल. तसेच कल्याण – तळोजा मेट्रो १२ अ या विस्तारीत मार्ग आणि कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ या प्रस्तावीत मेट्रो मार्गांशीही याचे समन्वय केले जाणार आहे.
या उन्नत मार्गामध्ये पहिल्या स्तरावर वाहनांसाठी रस्ता असणार आहे. तर दुसऱ्या स्तरावर मेट्रो मार्गिका असणार आहे. या मार्गावर ८ ठिकाणी प्रवेश (इंट्री) आणि निर्गमन (एक्झिट) रस्ते (रॅम्प) प्रस्तावित आहेत. या मार्गात २ रेल्वे उड्डाणपूल (पलावा – दिवा पनवेल आणि पत्री पूल क्रॉसिंग) तसेच २ प्रमुख पूल, देसाई खाडी आणि उल्हास नदी ( दुर्गाडी परिसर) प्रस्तावित आहेत.






