फोटो सौजन्य - Social Media
पातूर तालुक्यातील उमरा येथील स्व. रामरावजी गावंडे विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यंदाही क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. गुरुवार (दि. १) ते शनिवार (दि. ३) दरम्यान पार पडलेल्या या वार्षिक स्नेहसंमेलन, वकृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात उपस्थिती लावली.
कार्यक्रमाचे उद्घाटन चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रवींद्र लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी बालाजी युवक क्रीडा मंडळ, वाडेगावचे विलासराव वरोकार हे होते. प्रमुख अतिथी म्हणून सरपंच किशोर सुडोकार, माजी सरपंच वासुदेव चिपडे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गवई, ग्रामसेवक अरुण पोटदुखे, संचालक बाबुरावजी अजगर, उद्धव हरमकार आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकात मुख्याध्यापक रवींद्र इंगळे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा मांडत शाळेतील शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय करून देत त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने मंगलमय वातावरणात झाली.
या प्रसंगी खो-खो, क्रिकेट, धावणे, स्लो सायकल, वकृत्व स्पर्धा, सामान्य ज्ञान, रांगोळी, संगीत खुर्ची आदी स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत यश मिळवून जिल्हास्तरावर पात्र ठरलेल्या संघाचा विशेष गौरव करण्यात आला. यासोबतच मार्गदर्शक शिक्षक व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरुवात ‘आई मला शाळेत जायाच’ या भावस्पर्शी गीताने झाली. या कार्यक्रमात एकूण १९ ग्रुप्सनी सहभाग घेतला. इयत्ता ५ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक नृत्य, लावणी, समूह नृत्य व अभिनयाच्या सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकून घेतली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाला उपस्थित मान्यवरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
कार्यक्रमाचे संचालन दहावीच्या विद्यार्थिनींनी आत्मविश्वासाने केले. सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी व तयारीसाठी शाळेच्या शिक्षकवृंदांनी विशेष परिश्रम घेतले. बक्षीस वितरण समारंभाला ठाणेदार रवींद्र लांडे, अध्यक्ष विलासराव वरोकार, संचालक बाबुराव अजगर, विलास हुसे, भास्कर काळे, अरुण पोटदुखे, देवानंद कातखेडे, बळीराम घाटोळ, प्रकाश कंडारकर, विजय कातखेडे, डिगार्बर काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक रवींद्र इंगळे, तसेच प्रेमराज डोंगरे, पुरुषोत्तम खेडें, शिवदास बेलोकार, विलास काळपाडे, सुरेश राठोड, राजेश ढोरे, सुधाकर पवार, सुनील कातखेडे, सुभाष चिपडे, गजानन ढोपे, संजय चिपडे आणि सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. संचालन व आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.






