फोटो सौजन्य - Social Media
इंटेलिजन्स ब्युरो (IB) अंतर्गत गृह मंत्रालयामार्फत जाहीर करण्यात आलेली सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) / एक्झिक्युटिव्ह पदांची भरती २०२५ ही देशातील तरुणांसाठी एक मोठी आणि महत्वाची रोजगारसंधी ठरत आहे. भारतातील नामांकित गुप्तचर यंत्रणा असलेल्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये नोकरी मिळवणे हे अनेकांसाठी अभिमानास्पद मानले जाते. त्यामुळेच या भरतीची संधी तरुणांसाठी सुवर्णक्षण ठरू शकते.
या भरती अंतर्गत एकूण ४५५ रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नाही. उमेदवाराकडे संबंधित राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाचे डोमिसाईल प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हे बंधनकारक ठेवण्यात आले आहे. यामागचा उद्देश म्हणजे, निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्तरावर सहज संवाद साधता यावा आणि त्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये.
भरती प्रक्रियेत एकूण चार टप्पे असतील. सर्वप्रथम उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाईल. मोटर ट्रान्सपोर्ट पदासाठी अर्ज करणाऱ्यांची यानंतर ड्रायव्हिंग व कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे. पुढील टप्प्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखत होईल आणि शेवटच्या टप्प्यात वैद्यकीय तपासणी होईल. या सर्व चाचण्या यशस्वीरीत्या पार केल्यास उमेदवारांना अंतिम नियुक्ती मिळेल. परीक्षेची वेळ १ तास निश्चित करण्यात आली असून, प्रश्नपत्रिकेत नकारात्मक गुणांकन प्रणाली लागू असेल. चुकीच्या उत्तरासाठी १/४ गुण वजा केले जातील, त्यामुळे उमेदवारांनी काळजीपूर्वक प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.
वेतनमानाच्या बाबतीत ही नोकरी अत्यंत आकर्षक आहे. निवड झालेल्या उमेदवारांना सातवा वेतन आयोगानुसार ₹२१,७०० ते ₹६९,१०० इतके वेतनमान दिले जाईल. यासोबतच महागाई भत्ता, प्रवास भत्ता आणि इतर शासकीय सुविधा मिळतील. यामुळे ही नोकरी तरुणांना स्थिर करिअरसोबतच आर्थिक सुरक्षितता देखील देते.
वयोमर्यादा देखील स्पष्ट करण्यात आली आहे. अर्जदारांचे वय १८ ते २७ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची गणना २८ सप्टेंबर २०२५ रोजी करण्यात येईल. याशिवाय, अनुसूचित जाती, जमाती, अन्य मागासवर्गीय आणि इतर आरक्षण गटातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अधिसूचना तपासल्यानंतर अर्जदारांनी अर्ज भरावा, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि नंतर लागणारी फी भरावी. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून ठेवणे देखील आवश्यक आहे, जे भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरते.
राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची भूमिका बजावणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करण्याची ही संधी तरुणांसाठी अत्यंत विशेष आहे. या नोकरीत केवळ स्थिरता आणि आकर्षक वेतनमान नाही, तर देशसेवेचा अभिमानही मिळतो. त्यामुळे, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी हातून जाऊ देऊ नये.