देवेंद्र फडणवीसच अर्थसंकल्प मांडणार
मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार याची चर्चा सुरु होती. आता राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच मांडणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस राज्य सरकारमध्ये सत्तेत असली तरी अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर पक्षाकडे अर्थ खाते राहिलेले नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्त खाते न देता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्याचा निर्णय अंतिम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. आतापर्यंत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री म्हणून अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प मांडत होते. मात्र, आता त्यांच्या निधनानंतर अर्थसंकल्प कोण मांडणार याची चर्चा सुरु असतानाच स्वत: मुख्यमंत्री फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करणार असल्याचे समोर आले आहे.
हेदेखील वाचा : Sunetra Pawar New Deputy CM : एका दगडात दोन पक्षी! सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून शिंदे बाजूला; देवेंद्र फडणवीसांची ‘अग्निपरिक्षा
अजित पवार यांच्या निधनानंतर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले होते. अर्थसंकल्पावर दादांनी मोठे काम केले आहे. पुढचे उर्वरित काम मी करेन, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार, अर्थसंकल्पाची तयारी अंतिम टप्प्यात असून, त्यातील अनेक धोरणात्मक बाबींवर अजित पवार यांची छाप कायम राहणार असल्याचे मानले जात आहे.
सर्वसामान्यांचे लागले अर्थसंकल्पाकडे लक्ष
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः अर्थसंकल्प मांडणार असल्याने हे अधिवेशन राजकीयदृष्ट्या तसेच प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. राज्याच्या आर्थिक दिशा, विकासात्मक प्राधान्यक्रम, शेतकरी, उद्योग, महिला व तरुणांसाठीच्या तरतुदी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra ZP Election 2026: देवेंद्र फडणवीसांच्या पुढील सर्व सभा रद्द; जिल्हा परिषदांच्या तोंडावर मोठा निर्णय






