हीच खरी मैत्री! तब्बल पन्नास वर्षांनंतर दहावीचे वर्गमित्र एकत्र
नेवासे, (वार्ताहर): नेवासे तालुक्यातील पाचेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल माध्यमिक विद्यालयातील १९७४-७५ सालातील दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा बुधवारी थाटामाटात पार पडला. वयाची साठी ओलांडलेले हे वर्गमित्र तब्बल पन्नास वर्षांनंतर एकत्र आल्याचे अविस्मरणीय दृश्य यावेळी पाहायला मिळाले. दहावीनंतर एकमेकांपासून दुरावलेल्या मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्यासाठी भाऊसाहेब नामदेव जाधव यांनी विशेष पुढाकार घेतला. या स्नेहमेळाव्याला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शिक्षकांचे चरण स्पर्श करून स्वागत
मेळाव्याच्या सुरुवातीला तत्कालीन शिक्षक दिनकर कदम आणि अण्णासाहेब राऊत यांचे माजी विद्यार्थ्यांनी चरण स्पर्श करत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला शैक्षणिक प्रवास, व्यवसाय आणि सध्याचा पत्ता सांगून एकमेकांना ओळख करून दिली, तसेच एकमेकांच्या जीवनातील यशाबद्दल अभिमान व्यक्त केला. अनेक माजी विद्यार्थी आज व्यवसायिकता, उद्योजक, अधिकारी, पदाधिकारी, इंजिनीयर, शेतकरी आणि सामाजिक कार्य आदी पदांवर आपले जीवन सार्थकी लावत आहेत.
जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
माजी विद्यार्थ्यांनी १९६९ ते १९७५ सालातील (पाचवी ते दहावीपर्यंतचा) शालेय प्रवास ताजा केला. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देताना आपले शालेय दिवस, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि दिलेली शिक्षा, तसेच त्या काळातील रुसवाफुगवा आणि गमतीजमती कथन केल्या. यावेळी माजी विद्यार्थी जुन्या आठवणीत रमल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
हे देखील वाचा: शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम जाहीर! ‘या’ विषयांवर होणार परीक्षा
तत्कालीन शिक्षकांचा सन्मान
या कार्यक्रमाला तत्कालीन शिक्षक दिनकर कदम, शिक्षक अण्णासाहेब राऊत, भारत सर्व सेवा संघाचे सचिव प्रकाश जाधव, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मतकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका अलका पाटील आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार करत सन्मान केला.
दिवंगत शिक्षक व मित्रांना श्रद्धांजली
यावेळी दिवंगत शिक्षक बी. पी. साम्रुत, बाबुराव पाटील, जी. आर. देशमुख, तसेच दिवंगत माजी विद्यार्थी प्रा. भगवान शिंदे, रमेश साळुंके, गोवर्धन नांदे, अशोक रोडे, दौलत काळे, शब्बीर शेख, भाऊसाहेब दारकुंडे यांना उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली.
उपस्थित माजी विद्यार्थी
रंगनाथ पवार, भाऊसाहेब जाधव, गफार शेख, तुकाराम जाधव, विजय गोळेचा, सुभाष साळुंके, शिवाजी पवार, भास्कर वाकचौरे, रशीद शेख, एकनाथ पंडित, रघुनाथ लांडगे, शिवाजी रोडे, अशोक सावंत, बाबू शेख, विठ्ठल कोराळे, भगवान काकड, आत्माराम जाधव, शंकर वडीतके, गोकुळ जाधव, साहेबराव जाधव, एकनाथ सोनवणे, शिवाजी देसाई, गंगाराम तुवर, बबन शिंदे, निवृत्ती पवार, भागुबाई होन, जहानबाई रोडे आदी.
हे देखील वाचा: रिक्षाचालकाच्या मुलाने पहिल्याच प्रयत्नात पास केली UPSC परीक्षा! जिद्द असावी तर अशी…






