फोटो सौजन्य - Social Media
भारताच्या रोजगार बाजारासाठी २०२५ हे वर्ष निर्णायक ठरले आहे. याच कालावधीत भारताने नाममात्र जीडीपीच्या आधारे जपानला मागे टाकत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून स्थान पटकावले. या आर्थिक प्रगतीसोबतच रोजगार बाजारातही लक्षणीय हालचाल दिसून आली असून, डिजिटल भरती, महिला सहभाग आणि तरुणांचा वाढता सहभाग हे या बदलाचे प्रमुख घटक ठरले आहेत.
अपना.को (Apna.co) च्या ‘इंडिया अॅट वर्क २०२५’ अहवालानुसार, २०२५ मध्ये जॉबसाठी ९ कोटींहून अधिक अॅप्लिकेशन प्राप्त झाली असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत २९ टक्क्यांनी अधिक आहे. मेट्रो शहरांपलीकडे सेवा-केंद्रित भरतीचा विस्तार, डिजिटल रिक्रूटमेंट टूल्सचा वाढता वापर आणि नवोदित व महिलांचा वाढता सहभाग यामुळे ही वाढ शक्य झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
महिलांचा रोजगार बाजारातील सहभाग विशेषत्वाने वाढलेला दिसून येतो. फायनान्स, प्रशासकीय सेवा, ग्राहक अनुभव आणि आरोग्यसेवा सहाय्यक पदांसाठी महिलांकडून करण्यात आलेल्या अॅप्लिकेशनमध्ये सुमारे ३६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेचे निष्कर्षही महिलांची कार्यबलातील उपस्थिती वाढत असल्याचे स्पष्ट करतात. अधिकाधिक महिला औपचारिक, संरचित करिअर संधींकडे वळत असल्याचे चित्र यातून समोर येत आहे. तरुणाईनेही २०२५ मध्ये रोजगार बाजारात प्रभावी भूमिका बजावली आहे. सेवा आणि तंत्रज्ञान-सक्षम उद्योगांमध्ये तरुणांकडून सादर करण्यात आलेल्या अॅप्लिकेशनमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दरवर्षी जवळपास १ कोटी तरुण कार्यबलात सामील होत असून, नवोदित प्रतिभेमुळे भरती प्रक्रियेला सातत्याने गती मिळत आहे.
नियोक्त्यांच्या बाजूनेही भरतीची गती वाढलेली दिसून येते. २०२५ मध्ये ‘अपना’ प्लॅटफॉर्मवर १४ लाखांहून अधिक जॉब पोस्टिंग्स करण्यात आल्या, जे मागील वर्षाच्या तुलनेत १५ टक्के अधिक आहेत. लघु व मध्यम उद्योगांकडून (SMBs) १० लाख जॉब पोस्टिंग्स करण्यात आल्या असून, मोठ्या उद्योगांकडून ४ लाख पोस्टिंग्स नोंदवण्यात आल्या. बीएफएसआय, लॉजिस्टिक्स, ई-कॉमर्स, आरोग्यसेवा, मोबिलिटी आणि आयटी सेवा क्षेत्रांत भरतीची मागणी सर्वाधिक राहिली.
या बदलांवर भाष्य करताना अपना.कोचे जॉब्स मार्केटप्लेसचे सीईओ कार्तिक नारायणन म्हणाले की, २०२५ मधील आकडेवारी अधिक वितरित, कुशल आणि महत्त्वाकांक्षी कार्यबलाचे चित्र दर्शवते. महिला आणि नवोदित व्यावसायिक औपचारिक सेवा भूमिकांना प्राधान्य देत असून, उद्योग मेट्रो शहरांपलीकडे भरती वाढवत आहेत. एआय-आधारित तंत्रज्ञानामुळे भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकूणच, २०२५ मध्ये भारताचा जॉब मार्केट अधिक समावेशक, तंत्रज्ञानाधारित आणि गतिमान झाला असून, येत्या काळात ही गती आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.






