फोटो सौजन्य - Social Media
गुणवत्तापूर्ण शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ग्लोबल स्कूल्स ग्रुप (जीएसजी) यांनी यंदाच्या ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’ (जीसीएस) अंतर्गत १२ गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली आहे. नवी दिल्लीतील एरोसिटी येथे आयोजित विशेष समारंभात या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिष्यवृत्तीच्या १९व्या वर्षात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सिंगापूरमध्ये इयत्ता ११वी आणि १२वीचे पूर्णपणे प्रायोजित शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे.
यंदाच्या गटात भारतातील विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश असून, त्यापैकी आठ विद्यार्थी सिंगापूरमधील जीआयआयएस स्मार्ट कॅम्पस तर चार विद्यार्थी ओडब्ल्यूआयएस डिजिटल कॅम्पसमध्ये शिक्षण घेणार आहेत. कठोर निवड प्रक्रियेनंतर शैक्षणिक गुणवत्ता, नेतृत्वगुण आणि सर्वांगीण विकास या निकषांवर या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला सीबीएसईच्या कौशल्य शिक्षण व प्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. बिस्वजित साहा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
२००८ पासून सुरू असलेली ‘ग्लोबल सिटिझन स्कॉलरशिप’ ही जीएसजीची प्रमुख शिष्यवृत्ती योजना आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचे १०० टक्के शिक्षण शुल्क, वसतिगृह, निवास, भोजन, राहणीमानाचा खर्च तसेच मासिक भत्ता दिला जातो. दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यावर सुमारे एक कोटी रुपयांचा खर्च संस्थेकडून केला जातो. विद्यार्थ्यांना जीआयआयएसमध्ये सीबीएसई किंवा आयबीडीपी अभ्यासक्रमाची निवड करण्याची संधीही उपलब्ध आहे.
समारंभात विद्यार्थी, त्यांचे पालक, शिक्षक आणि ग्लोबल स्कूल्स ग्रुपचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्याबरोबरच जागतिक दृष्टीकोन असलेले भावी नेतृत्व घडविण्यासाठी शिक्षणाची भूमिका अधोरेखित करणे हा होता.
ग्लोबल स्कूल्स ग्रुपचे अकॅडमिक्स संचालक प्रमोद त्रिपाठी म्हणाले की, ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत नसून नेतृत्व, नावीन्यपूर्ण विचार आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकण्याची क्षमता असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये केलेली गुंतवणूक आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक गुणवत्तेसह चिकाटी, जिज्ञासा आणि जागतिक स्तरावर यशस्वी होण्यासाठी आवश्यक मूल्ये सिद्ध केली आहेत.
शिष्यवृत्ती मिळालेल्या एका विद्यार्थ्याने ही संधी आयुष्यातील मोठा सन्मान असल्याचे सांगितले. सिंगापूरमध्ये शिक्षण घेताना जागतिक दर्जाच्या शिक्षणासोबत विविध संस्कृतींचा अनुभव घेण्याची आणि स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याची संधी मिळणार असल्याचा आनंद त्याने व्यक्त केला.
सीबीएसईचे संचालक डॉ. बिस्वजित साहा यांनी अशा शिष्यवृत्ती योजना गुणवंत विद्यार्थ्यांना योग्य वेळी प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. शिक्षणाबरोबरच नेतृत्व, सर्जनशीलता आणि चारित्र्य विकासाला चालना देणारे उपक्रम विद्यार्थ्यांना भविष्यातील बदलत्या जगासाठी सक्षम बनवतात, असे ते म्हणाले.
जीएसजीचे डेप्युटी सीओओ राजीव कौल यांनी सांगितले की, गुणवत्ता सर्वत्र असते आणि योग्य संधी मिळाल्यास ती जागतिक स्तरावरही उजळून निघू शकते, हा विश्वास या शिष्यवृत्तीमुळे अधिक दृढ झाला आहे. यंदाचे १२ विद्यार्थी महत्त्वाकांक्षा, चिकाटी आणि मोठी स्वप्ने पाहण्याच्या धैर्याचे प्रतीक असून, ते भविष्यात जागतिक दृष्टीकोन असलेले जबाबदार नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.






