भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) बॉम्बेने विद्यार्थ्यांसाठी संशोधन क्षेत्रात करिअर घडवण्याची नवी दारे उघडली आहेत. “IIT रिसर्च इंटर्नशिप अवॉर्ड” या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रयोगशाळेतील प्रत्यक्ष अनुभव आणि प्राध्यापक- संशोधकांसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. तीन आठवड्यांचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच व्यावसायिक आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी मजबूत पाया घालणारा ठरणार आहे. या इंटर्नशिपसाठी पदवीच्या तिसऱ्या अथवा चौथ्या वर्षात किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षात असलेले आणि आपल्या विद्यापीठातील टॉप २० रँकमध्ये असलेले विद्यार्थी पात्र ठरणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे इच्छुक उमेदवारांना ०८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करता येणार असून, जानेवारी ते जून २०२६ या कालावधीत हा कार्यक्रम पार पडेल. IIT सारख्या प्रतिष्ठित संस्थेत शिकण्याची व संशोधन करण्याची ही संधी मिळणं विद्यार्थ्यांसाठी केवळ अभिमानाची बाबच नव्हे तर त्यांच्या करिअरला नवी दिशा देणारी ठरणार आहे.