फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र शासनाने कोविडनंतर शालेय शिक्षणात मोबाईलचा वापर अभ्यासासाठी करण्यास परवानगी दिल्याने विद्यार्थी माहिती (Alibaug) मिळवण्यासाठी गुगलचा वापर करतात. परंतु काही वेळा चुकीचे संदेश, अशोभनीय चित्रफिती किंवा धर्माविरुद्ध संदेश पाहून किंवा पुढे पाठवल्याने विद्याध्यांच्या जीवनात अनेक आपत्ती निर्माण होतात. त्यामुळे मोबाईल वापरताना विशेषतः मुलींनी काळजी घेणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन प्रा. डॉ. जयपाल पाटील यांनी केले. आर.सी.एफ. कुरुळ शाळेत इयत्ता ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित ‘आपत्ती सुरक्षा व्यवस्थापन शिबिरा’ प्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी डॉ. पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन भावे यांनी सत्कार केला. विद्यार्थ्यांकडून संविधान वाचन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण
तसेच, रायगड जिल्हा वाहतूक शाखेतील हवालदार अमित साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना परवाना नसताना वाहन चालवल्यास होणारा दंड व शिक्षेबाबत माहिती दिली. गावातील उंच घरातील बाळतपण झालेल्या महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना रुग्णवाहिकेपर्यंत कसे पोहोचवावे, तसेच घरातील गैस सिलेंडर, नळी व वीज साधनांमुळे उद्भवणाऱ्या आपतीपासून कसे सुरक्षित राहावे, याचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. या शिबिरास इयत्ता ५ वी ते ८ वीचे सुमारे २८० विद्यार्थी, ८ शिक्षक आणि २ कर्मचारी उपस्थित होते. जुईकर यांनी आभार प्रदर्शन केले. व्यासपीठावर मुख्याध्यापिका सरस्वती गायकवाड, उपमुख्याध्यापिका सौ. भावे, प्रा. डॉ. जयपाल पाटील व शिबिराचे संयोजक रवींद्रनाथ भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यसेवेवर मार्गदर्शन
शिबिरात विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन, आरोग्यसेवा आणि वाहतूक सुरक्षा याबाबत माहिती देण्यात आली. गावातील बाळंतपण आलेल्या महिला किंवा ज्येष्ठ नागरिकांना रुग्णवाहिकेची गरज भासल्यास महाराष्ट्र शासनाचा ११२ क्रमांकावर फोन करताच ३० मिनिटांत रुग्णवाहिका पोहोचते, याची माहिती देण्यात आली. जिल्हा रुग्णालयातील वाहनचालक मयुर पाटील आणि रोहीत सुर्यवंशी यांनी यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.






