राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयांबाबतची सर्व माहिती एका प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक विशेष डॅशबोर्ड तयार केला आहे. या डॅशबोर्डचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आले. या प्रसंगी विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, उपसचिव प्रताप लुबाळ, अशोक मांडे आणि संतोष खोरगडे उपस्थित होते. तर राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलगुरू आणि उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले.
मंत्री पाटील यांनी सांगितले की, या डॅशबोर्डच्या माध्यमातून राज्यातील 26 सार्वजनिक विद्यापीठे आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांची सविस्तर माहिती उपलब्ध होणार आहे. यात प्रवेश प्रक्रिया, परीक्षा निकाल, शिष्यवृत्ती योजना, वसतिगृहे, शुल्क रचना, महाविद्यालयांची संलग्नता, शैक्षणिक सुविधा आणि सार्वजनिक ग्रंथालय यांचा समावेश करण्यात आला आहे. हे सर्व डेटा एकाच व्यासपीठावर असल्याने शिक्षण व्यवस्थेचा एकत्रित आढावा घेणे सुलभ होणार आहे.
या डॅशबोर्डद्वारे केवळ शासकीय अधिकाऱ्यांनाच नव्हे, तर सर्वसामान्य विद्यार्थी आणि पालकांनाही शैक्षणिक विषयांची खात्रीशीर व अद्ययावत माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या अभ्यासक्रमासंदर्भात योग्य निर्णय घेणे शक्य होईल. पालकांसाठीही हे एक विश्वासार्ह स्रोत ठरणार आहे. या डॅशबोर्डवर उपलब्ध असलेल्या माहितीचे विश्लेषण करून शैक्षणिक धोरणे ठरविण्यास मदत होणार आहे. भविष्यात या डॅशबोर्डमध्ये खासगी विद्यापीठांचाही समावेश करून त्याचे स्वरूप अधिक व्यापक करण्याची योजना आहे. माहितीच्या विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करण्याचा मानस असल्याचेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
हा डॅशबोर्ड https://dashboardhtedu.maharashtra.gov.in/home या संकेतस्थळावर पाहता येऊ शकतो. राज्यातील विद्यार्थ्यांसाठी हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असून, शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता आणि निर्णयक्षमतेत वाढ होण्याची शक्यता आहे.