फोटो सौजन्य - Social Media
नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्र (अॅलोपॅथी) पद्धतीने व्यवसाय करण्याची परवानगी देण्यासाठी शासनाने विशिष्ट अटी घालून दिल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, नोंदणीकृत होमिओपॅथी वैद्यक व्यावसायिकांनी शासनमान्य सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (CCMP) अभ्यासक्रम पूर्ण केला असल्यास त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्रात वैद्यकीय सेवा देण्याची परवानगी दिली जाईल.
काही पात्रता निकष आहेत ज्यांना पात्र असणे अनिवार्य आहे. चला तर मग जाणून घेऊयात या पात्रता निकषांबद्दल. संबंधित वैद्यक व्यावसायिकांनी महाराष्ट्र समचिकित्सा वैद्यक व्यवसाय अधिनियम अंतर्गत नोंदणीकृत असणे अत्यावश्यक आहे. तसेच त्यांनी शासनमान्य सीसीएमपी अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केला असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. ही परवानगी होमिओपॅथी डॉक्टरांसाठी एक मोठी संधी असून त्यांना आधुनिक औषधोपचार पद्धतीत कार्य करण्याची अधिकृत परवानगी मिळेल.
किरकोळ आणि घाऊक औषध विक्रेत्यांना देखील याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांनी सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलेल्या आणि नोंदणीकृत डॉक्टरांकडून दिलेल्या प्रिस्क्रिप्शनच्या आधारावरच औषधांची विक्री करावी. औषध विक्री करताना प्रिस्क्रिप्शनवर डॉक्टरांचा नोंदणी क्रमांक, सीसीएमपी सर्टिफिकेट क्रमांक नमूद असल्याची खात्री करणे औषध विक्रेत्यांची जबाबदारी असेल. जर या अटींचे पालन न केले तर औषध विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे वरील सर्व नमूद बाबींचा आढावा घेत त्यांचे पालन करणे जबाबदारी आहे.
या परवानगीमुळे होमिओपॅथी वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना आधुनिक वैद्यकशास्त्रातील औषधोपचार करण्याची संधी उपलब्ध होईल. तथापि, यासाठी त्यांनी शासनमान्य मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात पारदर्शकता वाढून रुग्णांच्या आरोग्यासाठी गुणवत्तापूर्ण सेवा देणे शक्य होईल.
शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण आणि शहरी भागांतील रुग्णांना होमिओपॅथी आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या एकत्रित उपचार पद्धतीचा लाभ होईल. यामुळे वैद्यकीय सेवा अधिक परिणामकारक ठरण्याची अपेक्षा आहे. औषध विक्रीमध्ये देखील या परवानगीमुळे अधिक शिस्तबद्धता येईल आणि रुग्णांना योग्य उपचार मिळवण्याचा मार्ग सुलभ होईल. एकंदरीत, या निर्णयाचा फार मोठा फायदा राज्यात पाहायला मिळणार आहे. ग्रामीण भाग असो वा शहरी दोन्ही भागांना या निर्णयाचा पुरेपूर फायदा होणार आहे. अधिक माहितीसाठी, संबंधित वैद्यकीय व्यावसायिक आणि औषध विक्रेते यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, शासनमान्य अटी आणि शर्तींचे पालन करावे. यामुळे होणाऱ्या नव्या बदलांचा लाभ वैद्यकीय क्षेत्रातील सर्व घटकांना होईल.






