फोटो सौजन्य - Social Media
नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती)” च्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ओबीसी समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक उन्नतीसाठी राज्य सरकारने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओबीसी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रात ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात आली आहे. या मंत्रालयाच्या माध्यमातून समाजाच्या प्रगतीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे काम सुरू आहे. याच उद्देशाने स्थापन झालेली महाज्योती संस्था ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे काम करत आहे.
ओबीसी विद्यार्थ्यांसाठी राज्यात 60 हून अधिक वसतिगृहे सुरू करण्यात आली असून, स्वावलंबनासाठी ₹15 लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पीएचडी अभ्यासक्रम आणि स्पर्धा परीक्षांसाठी विशेष प्रशिक्षण केंद्रे सुरू केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाले आहे. या सर्व योजनांमुळे ओबीसी समाजातील नव्या पिढीला शिक्षणाच्या माध्यमातून प्रगतीची नवी दिशा मिळत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते पुढे म्हणाले की, ओबीसींसह अनुसूचित जाती आणि जमातींच्या विकासाची जबाबदारी राज्य सरकारची आहे. यासाठी “मोदी आवास घरकुल योजना” सुरू करण्यात आली आहे, ज्यामुळे अनेक कुटुंबांना स्वतःचे घर मिळू शकले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी विश्वास व्यक्त केला की, महाज्योतीची नव्याने उभी राहणारी अत्याधुनिक प्रशासकीय इमारत ओबीसी समाजासाठी एक भक्कम आधार ठरेल. या केंद्रातून ओबीसी विद्यार्थ्यांना शिक्षण, मार्गदर्शन आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. त्यांच्या स्वप्नांना नवे बळ मिळून ते आत्मविश्वासाने गगनभरारी घेतील.
या कार्यक्रमास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार डॉ. परिणय फुके तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत पार पडलेले भूमिपूजन समारंभ ओबीसी समाजाच्या नव्या युगाची सुरुवात ठरला.