फोटो सौजन्य - Social Media
मेडिकल क्षेत्र हे समाजसेवा आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानलं जातं. आजच्या काळात डॉक्टर, नर्स, फार्मासिस्ट, आणि संशोधक यांसारख्या व्यवसायांना मोठी मागणी आहे. मात्र या क्षेत्रात करिअर करण्यासाठी योग्य नियोजन, कठोर परिश्रम आणि सातत्याची गरज असते. चला, टप्प्याटप्प्याने समजून घेऊया की मेडिकलमध्ये करिअर कसं करावं. मेडिकल क्षेत्रात जाण्यासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ११वी आणि १२वीत विज्ञान शाखा (Biology Group) निवडणे. म्हणजेच विद्यार्थ्यांनी Physics, Chemistry, Biology (PCB) हे विषय शिकलेले असणे आवश्यक आहे. या टप्प्यावरच विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना स्पष्ट ठेवून अभ्यासात मजबूत पाया तयार करावा.
१२वी नंतर NEET (National Eligibility cum Entrance Test) ही परीक्षा देणं बंधनकारक आहे. ही परीक्षा भारतातील सर्व सरकारी आणि खासगी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशासाठी घेतली जाते. NEET मध्ये मुख्यतः फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांवर आधारित प्रश्न असतात. NEET उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना MBBS (Bachelor of Medicine and Bachelor of Surgery) किंवा BDS (Bachelor of Dental Surgery) या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळतो.
MBBS पाच अडीच वर्षांचा अभ्यासक्रम आहे. यामध्ये एक वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप असते. MBBS पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी डॉक्टर म्हणून काम करू शकतात किंवा पुढे MD / MS (Post Graduation) करून स्पेशलायझेशन निवडू शकतात. दंतवैद्य (Dentist) बनण्यासाठी BDS हा मार्ग आहे. आयुर्वेद, होमिओपॅथी किंवा युनानी वैद्यक शास्त्रात रस असणाऱ्यांसाठी BAMS / BHMS / BUMS उत्तम पर्याय आहेत. B.Sc Nursing, Pharmacy, Physiotherapy, Medical Lab Technology हे देखील मेडिकल क्षेत्रातील लोकप्रिय अभ्यासक्रम आहेत.
MBBS किंवा इतर वैद्यकीय पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्ही रुग्णालयात डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, शासकीय सेवा, संशोधन क्षेत्र, शिक्षण क्षेत्र किंवा स्वतःचा क्लिनिक सुरू करू शकता. परदेशातही भारतीय डॉक्टरांची मोठी मागणी आहे. मेडिकल क्षेत्रात करिअर करायचं म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर मानवतेची सेवा करण्याची संधी आहे. मेहनत, समर्पण आणि जबाबदारीची भावना असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे क्षेत्र यश, सन्मान आणि समाधान देणारं आहे.






