फोटो सौजन्य - Social Media
UPSC ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी अपार मेहनत, सातत्य आणि मानसिक ताकद लागते. अशाच जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा प्रत्यय देणारी व्यक्ती म्हणजे आयपीएस अधिकारी आशना चौधरी. त्या “ब्युटी विथ ब्रेन” या संकल्पनेचं जिवंत उदाहरण आहेत. UPSC CSE 2022 मध्ये त्यांनी 116 वी रँक मिळवत देशभरातील 933 यशस्वी उमेदवारांमध्ये स्थान मिळवलं.
उत्तर प्रदेशमधील हापुड़ जिल्ह्यातील पिलखुवा या छोट्याशा गावातून येणाऱ्या आशनाने शालेय शिक्षण गाझियाबादच्या दिल्ली पब्लिक स्कूलमधून पूर्ण केलं. त्यांनी 12वी परीक्षा ह्युमॅनिटीज शाखेतून दिली. त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून इंग्रजी साहित्यात पदवी घेतली. पुढे त्यांनी साउथ एशियन युनिव्हर्सिटी, दिल्ली येथून इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये मास्टर्स पूर्ण केलं. शिक्षणासोबतच त्यांचा घरातील शैक्षणिक पार्श्वभूमीही प्रेरणादायी आहे. त्यांच्या घरातील बरेच सदस्य पीएचडीधारक आहेत.
ग्रॅज्युएशननंतर त्यांनी UPSC च्या तयारीसाठी एक वर्ष ब्रेक घेतला. सुरुवातीच्या दोन प्रयत्नांत त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी वाजीराम अॅण्ड रवी या संस्थेच्या ऑनलाइन पोर्टलवरून मार्गदर्शन घेतलं आणि मागील वर्षांचे प्रश्नपत्रिका तपासून स्वत:ची अभ्यास पद्धती तयार केली. मास्टर्सच्या शिक्षणासोबत त्या दररोज 4 ते 8 तास अभ्यास करत असत. आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार हे त्यांचं मुख्य बळ ठरलं.
आशना अत्यंत आनंदी स्वभावाच्या असून आव्हानांना कधीही आपल्या मनावर हावी होऊ देत नाहीत. निराश झाल्यावर त्या कॉमेडी व्हिडिओ बघून मूड फ्रेश करत असत. त्यांनी UPSC इच्छुकांना सल्ला दिला आहे की, “प्लान बी” नेहमी तयार ठेवा. आज त्यांची IPS पदावर निवड झाली असून त्यांची पोस्टिंग उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाली आहे. त्या सोशल मीडियावरही सक्रिय असून आपल्या ट्रेनिंग व प्रवासाचे फोटो लोकांसोबत शेअर करत असतात. अलीकडे त्यांनी लोडेड गनसह फोटो शेअर केला असून त्याला ५०,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. आशना चौधरी यांची यशोगाथा ही केवळ अभ्यास आणि यश यापुरती मर्यादित नाही, तर ती आशावाद, चिकाटी आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कथा आहे.