फोटो सौजन्य - Social Media
दिल्लीच्या मिरांडा हाऊस कॉलेजचं नाव देशातल्या टॉप कॉलेजपैकी एक म्हणून घेतलं जातं. इथं शिकणं म्हणजेच प्रतिष्ठेची बाब. अभ्यासाबरोबरच इथले कल्चरल फेस्ट्सही तितकेच प्रसिद्ध. डान्स, सिंगिंग, ड्रामा, अभिनय या सगळ्या क्षेत्रांत विद्यार्थ्यांना आपली कला सादर करता येते. याच कॉलेजमध्ये होती श्रुती अग्रवाल! एक अशी विद्यार्थिनी जी तिच्या अभिनय आणि डान्ससाठी सगळ्यांच्या ओळखीची होती. पण कोणी कल्पना केली असेल का, की हीच मुलगी पुढे जाऊन आयपीएस अधिकारी होईल?
श्रुतीचा जन्म झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात झाला. तिने सुरुवातीचं शिक्षण देवघरमधल्या सेंट फ्रान्सिस शाळेत घेतलं. ती लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. दहावी झाल्यावर ती बोकारोला गेली आणि पुढचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर दिल्लीला जाऊन मिरांडा हाऊसमधून ग्रॅज्युएशन केलं. कॉलेजमध्ये ती कायमच सांस्कृतिक उपक्रमांचा भाग असे.
कॉलेज संपल्यावर श्रुतीने UPSC परीक्षा द्यायचं ठरवलं. पहिल्या दोन प्रयत्नांत तिला अपयश आलं, पण तिने हार मानली नाही. तिने मेन्ससाठी पूर्ण स्वअभ्यास केला आणि केवळ GS विषयासाठी कोचिंग घेतलं. तिसऱ्या प्रयत्नात तिची मेहनत फळाला आली आणि 2023 मध्ये तिने UPSC परीक्षेत 506वी रँक मिळवली.
IPS अधिकारी बनल्यानंतरही श्रुतीने आपली कला सोडली नाही. मसुरीमधल्या LBSNAA या ट्रेनिंग सेंटरमध्येही तिने डान्स आणि ड्रामा स्पर्धांमध्ये भाग घेतला. तिच्या व्यक्तिमत्त्वात असलेला आत्मविश्वास, जिद्द आणि कलेसाठी असलेली ओढ या सगळ्यांनीच तिच्या यशाला बळ दिलं. श्रुती अग्रवाल आज अनेक तरुणांसाठी प्रेरणा आहे. एक मुलगी जी अभिनय आणि डान्समध्ये चमकत होती, तीच चिकाटीने आणि समर्पणाने UPSC क्रॅक करून ‘लेडी सिंघम’ झाली. तिची ही कहाणी सांगते स्वप्नं कितीही वेगळी असली, तरी ठाम निर्धार असेल तर यश नक्की मिळतं!