फोटो सौजन्य - Social Media
भौगोलिक अडथळे दूर करणे आणि वेळेची बचत हे ऑनलाईन शिक्षणाचे मुख्य फायदे असल्यामुळे, अनेक विद्यार्थी आणि कामकाजी व्यक्ती ऑनलाईन शिक्षणाकडे आकर्षित होत आहेत. ‘द डिजिटल एज्युकेशन फ्रंटियर’ या अहवालात कॉलेज विद्याने याचा सखोल अभ्यास केला आहे. या अहवालात ५००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या आणि कामकाजी व्यक्तींच्या मतांचा विचार करण्यात आला आहे.
हे देखील वाचा : NIRRH मध्ये भरतीला सुरुवात; मुंबईत होणार उमेदवारांची नियुक्ती
अहवालानुसार, ८२% विद्यार्थी आणि ६६.२% कामकाजी व्यक्ती आपल्या सोयीनुसार कुठूनही आणि केव्हाही शिकता येण्याच्या सोयीला प्राधान्य देतात. वेळेची बचत हा आणखी एक मोठा फायदा असल्याचे ८१% विद्यार्थी आणि ७१.१% कामकाजी व्यक्तींनी मान्य केले आहे. ऑनलाईन शिक्षण किफायतशीर असल्याचं ६९% विद्यार्थी आणि ५१.९% कामकाजी व्यक्तींनी नमूद केले आहे. ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून सर्टिफिकेट्सना सर्वाधिक मान्यता आहे, ज्याचे समर्थन ९३% विद्यार्थी आणि ८५.७% कामकाजी व्यक्तींनी केले आहे. शिवाय, डिप्लोमा आणि डिग्रीही हळूहळू स्वीकारल्या जात आहेत. कामकाजी लोकांमध्ये ६७.५३% लोकांनी ऑनलाईन शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी वाढतील, असे म्हटले आहे.
तरीही ऑनलाईन शिक्षणासमोर काही आव्हाने आहेत. टियर १ आणि टियर २ शहरांमधील तांत्रिक अडचणी, ग्रामीण भागात इंटरनेटची कमतरता, आणि ऑनलाईन शिक्षणाच्या प्रमाणपत्रांच्या स्वीकार्यतेवर असलेला संशय यामुळे काही अडचणी निर्माण होतात. ७०% विद्यार्थ्यांच्या मते, ऑनलाईन शिक्षणात प्रायोगिक तत्वांचा अभाव असतो.
कॉलेज विद्याचे सीओओ रोहित गुप्ता म्हणाले, “शिक्षणाचे भविष्य डिजिटल संसाधने आणि टेक्निकवर निर्भर असणार आहे, यात शंकाच नाही. पण तरीही सर्व लोकांपर्यंत ते पोहोचविण्यासाठी आणि त्याचा स्वीकार वाढविण्यासाठी अनेक आव्हाने पार करावी लागणार आहेत. आमच्या या संशोधनाचा मुख्य उद्देश ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करून विद्यार्थी आणि कामकाजी व्यक्तींमध्ये त्याच्या संधींची समज विकसित करण्याचा आहे. आम्हाला विश्वास वाटतो की, योग्य उपक्रमांमुळे ऑनलाइन शिक्षणाची विश्वासार्हता आणि उपयोगिता वाढत जाईल आणि देशभरात ऑनलाइन शिक्षणाचा अधिकाधिक स्वीकार होईल.”
हे देखील वाचा : नेव्हल रॅपर शिप यार्डमध्ये भरतीची संधी; २१० रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज
याउप्पर, ६९% विद्यार्थी आणि ६८% कामकाजी व्यक्तींनी भविष्यात ऑनलाईन शिक्षण घेण्याची तयारी दर्शवली आहे. योग्य दिशेने पावले उचलून ऑनलाईन शिक्षणाचे अनेक पैलू मजबूत करता येतील आणि या माध्यमाचा स्वीकार वाढवता येईल.