सौजन्य - नवराष्ट्र टीम
एक एकर क्षेत्रात कोथिंबीरचे पीक घेण्यासाठी बी-बियाणे, तणनाशके, खत, कीडनाशके तसेच वाढीसाठी विविध औषधांवर अंदाजे चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो. मात्र सध्या मिळणारा बाजारभाव या खर्चाच्या तुलनेत अत्यंत तोकडा आहे. कोथिंबीर काढणीसाठी लागणारी मजुरी, वाहतूक खर्च आणि बाजारात पाठवण्याचा खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी कोथिंबीर काढणेच बंद केले आहे. काही भागांत तर शेतकऱ्यांनी थेट कोथिंबीरच्या पिकात शेळ्या व मेंढ्या सोडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कष्टाने उगवलेले पीक बाजारात नेण्यापेक्षा शेतातच सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. बाजारात आवक वाढली असली तरी मागणीअभावी दर घसरले असून, व्यापारीही कमी दर देत आहेत. याचा थेट फटका अल्पभूधारक आणि भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. शासनाने या परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
“कोथिंबीर पिकावर हजारो रुपये खर्च करूनही बाजारात पाच-सहा रुपयांना जुडी विकावी लागत आहे. काढणी, मजुरी व वाहतूक खर्चही निघत नाही, त्यामुळे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. सरकारने तातडीने आधारभाव जाहीर करावा अशी मागणी आहे.” – प्रा. वसंतराव भालेराव,शेतकरी विठ्ठलवाडी.
हे सुद्धा वाचा : ‘ग्रँड टूर’ पाठोपाठ थंडीनेही घेतला पुणेकरांचा निरोप; दोन दिवसांत तापमानात…






