राष्ट्रीय मतदार दिवस (फोटो- istockphoto)
आज आहे जाणार राष्ट्रीय मतदार दिवस
आज झाली होती भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना
मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार
सुनयना सोनवणे / पुणे: देशभरात दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो. भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा होणारा हा दिवस लोकशाहीतील मतदारांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करणारा मानला जातो. विविध शासकीय कार्यक्रम, मतदार शपथविधी, जनजागृती रॅली तसेच सत्कार समारंभांच्या माध्यमातून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. मात्र हा दिवस केवळ औपचारिक उत्सवापुरताच मर्यादित राहतो आहे की खरोखरच तो लोकशाहीच्या आत्मपरीक्षणाची संधी ठरतो आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकशाही व्यवस्थेत मतदान हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. तरीही अनेक निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी अपेक्षेप्रमाणे वाढताना दिसत नाही. विशेषतः शहरी भागातील मतदार, तरुण वर्ग आणि स्थलांतरित नागरिक मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रियेपासून दूर राहतात. ‘माझ्या एका मताने काय फरक पडणार?’ ही मानसिकता लोकशाहीसाठी गंभीर आणि चिंताजनक मानली जाते.
राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने निवडणूक प्रशासनाकडून नवमतदार नोंदणी, मतदार ओळखपत्रांचे वितरण तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये लोकशाहीविषयक जनजागृती कार्यक्रम राबविले जातात. ईव्हीएम–व्हीव्हीपॅट प्रणाली, ऑनलाईन मतदार नोंदणी, तसेच ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी घरोघरी मतदान सुविधा यांसारख्या अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. मात्र या सर्व प्रयत्नांनंतरही लोकसहभागात अपेक्षित वाढ झालेली दिसून येत नाही, हे वास्तव नाकारता येत नाही.
मतदान हा केवळ हक्क नसून नागरिकांची मोठी जबाबदारी आहे. मतदान न करणे म्हणजे केवळ स्वतःचा अधिकार न वापरणे नव्हे, तर देशाच्या निर्णयप्रक्रियेपासून स्वतःला दूर ठेवण्यासारखे आहे. अनेक वेळा एका मताचे महत्त्व दुर्लक्षित केले जाते; मात्र इतिहासात अनेक निवडणुका अल्प मतांनी निर्णायक ठरल्याची उदाहरणे आहेत. एका मताचे सामर्थ्य हे बदल घडवणारी छोटी पण प्रभावी कृती ठरू शकते.
लोकशाहीचा खरा कणा म्हणजे सजग आणि माहितीपूर्ण मतदार. जात, धर्म, पैसा किंवा भावनिक आवाहनांपेक्षा विकास, पारदर्शकता आणि धोरणांचा विचार करून मतदान करणारा मतदारच लोकशाही मजबूत करू शकतो. खोटी माहिती, अफवा आणि प्रलोभनांना बळी न पडता जागरूक निर्णय घेणे ही आजच्या मतदाराची खरी कसोटी आहे.
राष्ट्रीय मतदार दिवस हा लोकशाहीचा उत्सव आहेच; मात्र त्याहून अधिक तो प्रत्येक नागरिकाने स्वतःला प्रश्न विचारण्याचा दिवस आहे. आपण सजग, जबाबदार आणि सक्रिय मतदार आहोत का? या आत्मपरीक्षणातूनच जबाबदार मतदानाची संस्कृती निर्माण होईल आणि त्यातूनच सशक्त व सक्षम लोकशाही उभी राहील.
“लोकशाहीचा कणा म्हणजे निवडणूक आणि निवडणुकीचा आत्मा म्हणजे मतदार. सजग मतदारातूनच सशक्त लोकशाही टिकून राहते. जितका मतदारांचा सहभाग जास्त, तितकी लोकशाही अधिक प्रगल्भ होते. त्यामुळे मतदार जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे.”
— उल्हास बापट, राज्यघटना अभ्यासक






