(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये शनिवारी तीन वाइल्डकार्ड स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. त्यामुळे घरातील सदस्यांना मोठा धक्का बसला आहे. रेवा कौरासे, संकेत पाठक आणि संस्कृती साळुंके या सदस्यांनी घरात एन्ट्री घेतली आहे. या तिघांच्या एन्ट्रीनंतर घरात काय काय घडणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.
बिग बॉसच्या घरात वाइल्डकार्ड म्हणून प्रवेश करणं म्हणजे केवळ दमदार उपस्थिती नव्हे, तर पहिल्याच क्षणी वेगळी छाप पाडणं असतं. संकेत पाठकने एंट्री घेतली तेव्हा त्याच्या आत्मविश्वासाची चर्चा झालीच; मात्र त्यानंतर घडलेला एक छोटासा प्रसंग घरात वेगळाच ठसा उमटवून गेला.
घरात पाऊल ठेवताच संकेतने सर्व सदस्यांचं मनापासून कौतुक केलं. “तुम्ही सगळे खूप छान दिसत आहात आणि उत्तम खेळत आहात,” अशा शब्दांत त्याने सकारात्मक सुरुवात केली. स्पर्धा, तणाव आणि सतत बदलणाऱ्या समीकरणांच्या वातावरणात अशी थेट आणि मनापासूनची प्रशंसा क्वचितच ऐकायला मिळते.
यानंतर संकेतने घरातल्यांसाठी स्वतः घरी बनवलेले लाडू आणल्याचं सांगत ते सदस्यांमध्ये वाटले. लाडू वाटताना सर्वात आधी राखी सावंत आणि रुचिकाने ते स्वीकारले. त्या क्षणी घरात हलकं आणि आनंदी वातावरण निर्माण झाले होते. अनेक स्पर्धक घरापासून दूर असल्यामुळे या छोट्याशा पण आपुलकीच्या कृतीने काहींच्या चेहऱ्यावर घरची आठवण स्पष्ट दिसत होती.
बिग बॉसच्या घरात रणनीती आणि खेळ महत्त्वाचा असतोच; मात्र नात्यांची पायाभरणीही तितकीच निर्णायक ठरते. वाइल्डकार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करताना संकेतने पहिल्याच दिवशी ‘मानवी स्पर्श’ दाखवत आपली वेगळी ओळख अधोरेखित केली.
एंट्रीची चर्चा एक गोष्ट; पण घरातला सूर बदलण्याचा प्रयत्न ही वेगळी. संकेतच्या या गोड सुरुवातीमुळे पुढील खेळात तो कोणती दिशा घेतो, याकडे आता प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.






