फोटो सौजन्य - Social Media
या भव्य सोहळ्यात नायर दंत महाविद्यालयाने आपली गुणवत्ता, संशोधन क्षमता आणि रुग्णसेवा यातील उत्कृष्टता पुन्हा एकदा सिद्ध करत पाच मानाचे पुरस्कार पटकावले. राज्यातील अग्रगण्य दंत शिक्षण संस्था म्हणून आपली ओळख अधिक भक्कम करत महाविद्यालयाला तीन मुख्य विभागांत महाराष्ट्रातील सर्वोत्तम दंत शिक्षण संस्था, सर्वोत्तम शैक्षणिक व संशोधन कार्य, तसेच सर्वोत्तम रुग्ण सेवा हे तीन पुरस्कार मिळाले. या तिन्ही श्रेणी संस्थेच्या सर्वांगीण कार्यक्षमतेचे प्रतिबिंब असून, विद्यार्थ्यांसोबतच प्राध्यापक आणि रुग्णसेवा विभागाच्या सततच्या प्रयत्नांचे द्योतक आहेत.
याशिवाय, महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री डॉ. नीलम अन्द्राडे यांना दंतचिकित्सा क्षेत्रातील दीर्घकालीन योगदान, नेतृत्वगुण आणि उल्लेखनीय शैक्षणिक कार्यासाठी लाइफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. तसेच ओरल आणि मॅक्सिलोफेशियल सर्जरी क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना दुसऱ्या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. हा दुहेरी सन्मान संस्थेच्या नेतृत्वावर असलेला विश्वास आणि प्रगतीशील दृष्टीकोन अधोरेखित करणारा आहे.
परिषदेत केवळ वरिष्ठ तज्ञच नव्हे तर विद्यार्थ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदवला. नायर दंत महाविद्यालयातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी संशोधन सादरीकरणे, पोस्टर प्रेझेंटेशन आणि शैक्षणिक कामगिरीतून चमकदार यश मिळवत स्वतंत्र पुरस्कार पटकावले. विद्यार्थ्यांची ही कामगिरी महाविद्यालयातील शैक्षणिक वातावरण, मार्गदर्शन आणि संशोधन संस्कृती उच्च दर्जाची असल्याचे स्पष्टपणे दर्शवते.
पाचही पुरस्कारांची कमाई, अधिष्ठात्रींचा दुहेरी सन्मान आणि विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश यामुळे नायर दंत महाविद्यालयाने पुन्हा एकदा राज्यातीलच नव्हे तर राष्ट्रीय स्तरावरही दंत शिक्षण क्षेत्रात आपले वर्चस्व आणि प्रतिष्ठा सिद्ध केली आहे. परिषदेत मांडले गेलेले संशोधन निष्कर्ष आणि नव्या उपचार पद्धतींची देवाणघेवाण यामुळे दंतचिकित्सेचे भविष्य अधिक नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक होणार असल्याचा विश्वास वारंवार व्यक्त करण्यात आला.






