फोटो सौजन्य - Social Media
पवन हंस लिमिटेडने आपल्या विविध विभागांमध्ये नवीन भरतीची घोषणा केली आहे. एकूण 17 पदांसाठी ही भरती होणार असून त्यामध्ये स्टेशन इनचार्जसाठी 8 पदे, हेल्परसाठी 8 पदे आणि असिस्टंटसाठी 1 पदाचा समावेश आहे. ही भरती विशेषतः पात्र आणि अनुभवी उमेदवारांसाठी असून, संबंधित शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावा. असिस्टंट पदासाठी इच्छुक उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर संबंधित क्षेत्रात किमान तीन वर्षांचा अनुभव असणे अपेक्षित आहे. याशिवाय, स्टोअर्स किंवा मटेरियल्स मॅनेजमेंटमध्ये दोन वर्षांचा डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना एक वर्षाच्या अनुभवासह देखील पात्र मानले जाईल.
स्टेशन इनचार्ज या पदासाठी उमेदवाराकडे पदवीसह संबंधित क्षेत्रात किमान दोन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. परंतु जर उमेदवाराकडे मार्केटिंग, फायनान्स, एव्हिएशन किंवा तत्सम क्षेत्रात पदव्युत्तर पदवी किंवा दोन वर्षांचा डिप्लोमा असेल, तर एका वर्षाचा अनुभव असलेले उमेदवारही अर्ज करण्यास पात्र आहेत. हेल्पर पदासाठी फक्त आठवी पास असणे पुरेसे आहे. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या कमी पात्रता असलेल्या उमेदवारांसाठीही ही एक चांगली संधी आहे.
वयोमर्यादेच्या दृष्टीने, हेल्पर पदासाठी कमाल वयोमर्यादा 25 वर्षे ठेवण्यात आली आहे, तर असिस्टंट आणि स्टेशन इनचार्ज या पदांसाठी ही वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा अर्ज प्राप्त होण्याच्या अंतिम तारखेच्या आधारे गणली जाणार असून, उमेदवारांनी अर्ज करताना त्यानुसार आपली पात्रता तपासून पाहणे गरजेचे आहे. वय आणि पात्रतेच्या अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक चांगली संधी आहे. वेतनबाबत बोलायचं झाल्यास, असिस्टंट आणि स्टेशन इनचार्ज पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना वार्षिक अंदाजे ₹6.12 लाखांचा एकूण CTC (Cost to Company) दिला जाईल. तर, हेल्पर पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना अंदाजे ₹3.22 लाख CTC वार्षिक स्वरूपात मिळणार आहे, जे नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर एक चांगले आर्थिक पॅकेज मानले जाते.
ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून, पात्र उमेदवारांनी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर https://www.pawanhans.co.in/ या लिंकवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावा. अर्ज करताना सर्व आवश्यक शैक्षणिक, अनुभव आणि ओळखपत्रांसह कागदपत्रांची माहिती नीट भरावी. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2025 आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता लवकरात लवकर आपला अर्ज सादर करावा. सरकारी क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुण-तरुणींनी ही सुवर्णसंधी गमावू नये. योग्य पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी पवन हंस लिमिटेडकडील ही भरती एक उज्वल करिअर घडवणारी संधी ठरू शकते.