नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हिगोली पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर कारवाई केली (फोटो - सोशल मीडिया)
हिंगोली : नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभाग, हिंगोली विभागाच्या वतीने जिल्हाभर विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अवैध दारूविक्री व वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत तीन वाहने व विविध प्रकारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण १० लाख ७१ हजार ४६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी ४७ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.
नाताळ व थर्टी फस्ट निमित्ताने १५ ते ३० डिसेंबर या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके गठित करण्यात आले होते. या पथकांनी सेनगाव, कळमनुरी, हिंगोली, वसमत व औंढा नागनाथ परिसरात छापे टाकून अवैध मद्यविक्री व वाहतुकी विरोधात कारवाई केली. या कारवाईत देशी मद्याच्या १,३८४ बाटल्या, हातभट्टी १०२ लिटर, विदेशी दारू ४.३२ लिटर, ताडी १४ लिटर, रसायन ५० लिटर तसेच ९ वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ही कारवाई निरीक्षक मोहन मातकर, रमेश चाटे, दुय्यम निरीक्षक टी. बी. शेख, कृष्णकांत पुरी, प्रदीप गोनारकर, सौ. ज्योती गुठे तसेच सहाय्यक दुय्यम निरीक्षक कांबळे आणि जवान आडे, राठोड यांच्या सहभागाने पार पडली.
मद्य पिऊन झिंगणाऱ्या १९ जणांची उतरवली नशा
नववर्षाच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी रात्री रस्त्यावरील अपघात व जीवितहानी टाळण्यासाठी हिंगोली जिल्हा पोलीस दलाने संपूर्ण जिल्ह्यात कडक नाकाबंदी राबवली. जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत अनेक ठिकाणी ही नाकाबंदी करण्यात आली होती. या मोहिमेत पोलिस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार सहभागी झाले होते.
हे देखील वाचा : महापालिका निवडणुकीत मोठा ट्वीस्ट; मनसेचे दोन उमेदवार नॉट रिचेबल, कालपासून एकही फोन नाही
नाकाबंदी दरम्यान हायगयी व निष्काळजीपणे वाहन चालवणे तसेच दारू पिऊन वाहन चालवणे या प्रकारात एकूण १८ केसेस दाखल करण्यात आल्या असून अनेक तळीरामांची झिंग उतरवण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे किरकोळ घटना वगळता मादक पदार्थांच्या सेवनामुळे कोणताही गंभीर अपघात झाल्याची नोंद नाही, यासोबतच हॉटेल, ढाबे व लॉजेसची कठोर तपासणी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तळीरामांवर वेळीच नियंत्रण ठेवून कायदेशीर कारवाई करण्यात आली.
हे देखील वाचा : विधानसभा अध्यक्षांचे CCTV फुटेज गायब? राहुल नार्वेकरांविरोधात निवडणूक आयोगाची कारवाई






