ससून रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीला यंदा उमेदवारांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, ही भरती रुग्णालयासाठी तसेच नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राज्यातील ऐतिहासिक व प्रमुख रुग्णालय म्हणून ससूनची ओळख आहे. दररोज हजारो रुग्ण येथे उपचारासाठी दाखल होत असतात. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सेवक, आया, हमाल, रुग्णपटवाहक, स्वच्छता कर्मचारी यांसारख्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची कमतरता भासत होती.
IOCL मध्ये दोन पदांसाठी भरती! जाणून घ्या निकष आणि ताबडतोब करा अर्ज
त्यामुळे रुग्णालयातील कामकाजावर मोठा ताण पडत होता. स्वच्छतेपासून ते रुग्णांना स्ट्रेचरवर हलविण्यापर्यंतची जबाबदारी थोड्याच कर्मचाऱ्यांवर होती. काहीवेळा रुग्णांच्या नातेवाईकांना स्ट्रेचर ढकलण्यासारखे काम करावे लागत असल्याच्या तक्रारी अनेकदा पुढे आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय शिक्षण विभागाने ३५४ पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. या भरतीसाठी तब्बल ३० हजार अर्ज आले असून, त्यापैकी २६ हजारांहून अधिक उमेदवार पात्र ठरले आहेत.
कक्षसेवक, आया, सेवक, पहारेकरी, क्ष-किरण सेवक, नाभिक, स्वयंपाकी सेवक आणि प्रयोगशाळा सेवक अशा विविध पदांसाठी ससून रुग्णालयातील मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, केवळ पुण्यातूनच जवळपास दहा हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, तर नांदेड, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, लातूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतूनही हजारोंच्या संख्येने अर्ज आले आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया आयबीपीएस या नामांकित संस्थेमार्फत पार पाडली जाणार असून, लवकरच उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्यानंतर निवड प्रक्रियेचा पुढील टप्पा सुरू होईल.
मंदिर व्यवस्थापनातील नवी पिढी तयार करण्यासाठी वीस्कूल सज्ज! दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश जाहीर
नव्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्यानंतर ससून रुग्णालयातील अनेक वर्षांपासून जाणवणारी कर्मचाऱ्यांची कमतरता दूर होईल, स्वच्छतेची पातळी मोठ्या प्रमाणात सुधारेल, रुग्णांना वेळेत व योग्य प्रकारची सेवा मिळेल तसेच दैनंदिन कामकाजाला आवश्यक वेग प्राप्त होईल. रोजगाराच्या या मोठ्या संधीमुळे अनेक बेरोजगार तरुणांचे स्वप्न साकार होणार असून, त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळेल. त्यामुळे दीर्घकाळ प्रलंबित असलेली ही भरती अखेर पूर्णत्वाला जात असल्याचा आनंद उमेदवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून, नव्या आशा आणि अपेक्षांना उभारी मिळाली आहे.