फोटो सौजन्य - Social Media
प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (वीस्कूल), मुंबई यांनी भारतातील पहिल्या पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्रॅम इन टेंपल मॅनेजमेंट (PGPTM) च्या दुसऱ्या बॅचसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याची घोषणा केली आहे. पहिल्या बॅचच्या यशानंतर हा कार्यक्रम आता अधिक व्यापक स्वरूपात राबवला जात असून सप्टेंबर 2025 पासून नवीन बॅच सुरू होणार आहे. हा अभ्यासक्रम टेम्पल कनेक्ट या संस्थेच्या सहकार्याने तयार करण्यात आला असून, मंदिर व धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाला व्यावसायिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून बळकटी देणे हा त्यामागचा उद्देश आहे.
आज मंदिर केवळ उपासनेसाठीची जागा न राहता सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून कार्यरत आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापनाची व्यावसायिक गरज अधोरेखित होत असून वीस्कूलचा हा उपक्रम त्या दिशेने एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. या अभ्यासक्रमात समुदाय व्यवस्थापन, आध्यात्मिक अर्थव्यवस्था, वारसा संवर्धन, धार्मिक संस्थांमधील नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य अशा विविध विषयांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकता यावे यासाठी मंदिर भेटी, तज्ज्ञांशी संवाद, विविध व्यवस्थापन पद्धतींचे निरीक्षण अशा प्रॅक्टिकल उपक्रमांचाही समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या बॅचमध्ये ISKCON चौपाटी, ऋषिकेश, जीवदानी देवी मंदिर यांसारख्या संस्थांबरोबरच कॉर्पोरेट क्षेत्रातील व्यावसायिकांनीही सहभाग नोंदवला होता. यंदा प्रवेशसंख्या तीनपट वाढून 60 पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या कार्यक्रमाच्या महत्त्वावर बोलताना वीस्कूलचे ग्रुप डायरेक्टर प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी सांगितले की, “PGPTM च्या पहिल्या बॅचचे यश हे आमच्या सामाजिक जबाबदारीशी निगडीत शैक्षणिक दृष्टीकोनाचे उदाहरण आहे. आधुनिक व्यवस्थापन पद्धती आणि भारताचा आध्यात्मिक वारसा यांचा संगम साधून आम्ही अशी व्यावसायिकांची नवी पिढी तयार करू इच्छितो जी समाजाच्या विविध क्षेत्रांत सकारात्मक बदल घडवेल.”
मंदिर व्यवस्थापनात शैक्षणिक व व्यावसायिक कौशल्यांना एकत्र आणणारा हा देशातील पहिला उपक्रम असल्यामुळे याला विद्यार्थ्यांकडून आणि धार्मिक संस्थांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. आधुनिक काळात धार्मिक संस्था आणि मंदिरे समाजजीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याने या उपक्रमातून प्रशिक्षित व्यवस्थापकांची नवी पिढी तयार होणे ही काळाची गरज असल्याचे तज्ज्ञ मानतात.