फोटो सौजन्य - Social Media
राजस्थानमध्ये शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी रीट (REET – Rajasthan Eligibility Examination for Teachers) ही परीक्षा सर्वात मोठी आशा मानली जाते. ही केवळ पात्रता परीक्षा नसून राजस्थानच्या शासकीय शाळांमध्ये तृतीय श्रेणी शिक्षक (3rd Grade Teacher) होण्यासाठीची महत्त्वाची पहिली पायरी आहे. सध्या सुरू असलेल्या रीट परीक्षेमुळे उमेदवारांमध्ये उत्सुकता आणि तणावाचे वातावरण आहे. या परीक्षेत यश मिळवणारे उमेदवार पुढील टप्प्यात प्राथमिक (इयत्ता १ ते ५) आणि उच्च प्राथमिक (इयत्ता ६ ते ८) शाळांमध्ये अध्यापनासाठी पात्र ठरतात.
रीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरचा प्रवास मात्र सोपा नसतो. राजस्थान सरकारमधील शिक्षकाची नोकरी सामाजिक प्रतिष्ठेसोबतच आर्थिक स्थैर्यही देते. त्यामुळे अनेक उमेदवारांच्या मनात प्रश्न असतो की, रीट पास केल्यानंतर नेमकी कोणती नोकरी मिळते, मासिक वेतन किती असते आणि पास होण्यासाठी किमान किती गुण आवश्यक असतात. या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणे उमेदवारांसाठी महत्त्वाचे आहे.
रीट परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार तृतीय श्रेणी शिक्षक पदासाठी पात्र ठरतो. ही भरती दोन स्तरांमध्ये होते. लेव्हल-1 अंतर्गत निवड झालेले उमेदवार इयत्ता १ ते ५ पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, ज्यांना प्राथमिक शिक्षक म्हटले जाते. लेव्हल-2 अंतर्गत निवड झालेले उमेदवार इयत्ता ६ ते ८ पर्यंत अध्यापन करतात, म्हणजेच उच्च प्राथमिक शिक्षक. रीटचे पात्रता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर राजस्थान कर्मचारी निवड मंडळ (RSSB) जेव्हा मुख्य भरती परीक्षेची जाहिरात काढते, तेव्हा उमेदवार त्या परीक्षेसाठी अर्ज करून कायमस्वरूपी शासकीय नोकरी मिळवू शकतात.
राजस्थानमध्ये सातव्या वेतन आयोगानुसार तृतीय श्रेणी शिक्षकांचे वेतन आकर्षक आहे. निवडीनंतर सुरुवातीचे दोन वर्षे प्रोबेशन कालावधी असतो. या काळात सुमारे २३,७०० रुपये प्रतिमाह निश्चित मानधन दिले जाते. प्रोबेशन पूर्ण झाल्यानंतर वेतन पे-मॅट्रिक्स लेव्हल-10 नुसार निश्चित होते. बेसिक वेतन, महागाई भत्ता (DA) आणि घरभाडे भत्ता (HRA) धरून सुरुवातीपासूनच ४५,००० ते ५०,००० रुपये प्रतिमाह वेतन मिळते.
रीट ही पात्रता परीक्षा असल्याने विविध प्रवर्गांसाठी वेगवेगळे किमान गुण निश्चित करण्यात आले आहेत. सामान्य प्रवर्गासाठी १५० पैकी ६० टक्के म्हणजेच ९० गुण आवश्यक आहेत. EWS, OBC, SC, ST प्रवर्गासाठी ५५ टक्के (सुमारे ८३ गुण) अनिवार्य आहेत. दिव्यांग तसेच विधवा किंवा परित्यक्ता उमेदवारांसाठी ४० ते ५० टक्के गुणांची अट आहे. TSP क्षेत्रातील ST उमेदवारांसाठी किमान ३६ टक्के गुण आवश्यक आहेत.
रीट पास करणे म्हणजे थेट नोकरीची हमी नसते. हे केवळ पात्रतेचे प्रमाणपत्र आहे, ज्याची वैधता आता आजीवन करण्यात आली आहे. त्यानंतर उमेदवारांना राज्य सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या मुख्य भरती परीक्षेला सामोरे जावे लागते. त्या परीक्षेतील गुणवत्तेनुसारच शाळा वाटप आणि नियुक्ती केली जाते. राजस्थानमध्ये शासकीय शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि सर्वांगीण विकास करणे ही मुख्य जबाबदारी असते. याशिवाय मध्यान्ह भोजन योजना, जनगणना, निवडणूक ड्युटी यांसारख्या शासकीय कामांमध्येही शिक्षकांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे रीट परीक्षा ही केवळ नोकरीसाठी नाही, तर समाज घडवण्याची संधी देणारी परीक्षा मानली जाते.






