फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये अनेक उपवास केले जातात. प्रत्येक उपवासाचं महत्त्व वेगळं सागण्यात आलं आहे. प्रत्येक उपवास करण्याची पद्धतही भिन्न असते. महिन्याच्या कृष्ण चतुर्थीला संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते. यादिवशी दिवसभर उपवास केल्यानंतर रात्री चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडण्याचे एक वेगळे महत्त्व आहे. धर्मशास्त्रात याबाबत एक आख्यायिका सांगितली आहे.
संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करून चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. यावेळी मोदकाचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत आहे. गणपतीला मोदक प्रिय आहे नैवेद्य दाखवल्यानंतर भोजन करावे. हे व्रत आमरण किंवा 21 वर्षे किंवा एक वर्ष असावा. व्रतराज या ग्रंथात या व्रताबाबत सांगितले आहे. शुक्रवार, 6 मार्च रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाणार आहे. आज चंद्रोद्य रात्री 9.31 वाजता आहे.
एकदा गणपती उंदरावर बसून घाईघाईने जात असताना घसरला. तेव्हा त्याला बघून चंद्र उपहासाने हासला. ते पाहून गणपतीला चंद्राचा प्रचंड राग आला. त्या रागाच्या भरात गणपतीने चंद्राला शाप दिला की “आजपासून तुझं कुणी तोंड पाहणार नाही. जो कोणी पाहील त्यावर खोटा आळ येईल!” गणपतीचा हा शाप ऐकून चंद्र भयभीत झाला व क्षमा करुन शाप मागे घ्या, अशी विनवणी करू लागला. गणपती ऐकत नाही हे चंद्राच्या लक्षात आलं, तेव्हा चंद्रानं मोठं तप करून श्रीगणपतीला प्रसन्न करुन घेतलं.
चंद्राच्या तपामुळे आणि सर्व देवांनी प्रार्थना केल्यामुळे गणपतीने चंद्राला शापातून मुक्त केलं. पण वर्षातून एक दिवस ‘भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी’ तुझं तोंड कुणी पाहणार नाही आणि जो कुणी पाहील त्यावर त्या वर्षी खोटा आळ येईल असे सांगितले. त्यावर चंद्राने प्रार्थना केली की जर कुणी चुकून गणेश चतुर्थीच्या दिवशी माझं तोंड पाहिलं तर खोटा आळ येऊ नये म्हणून त्याने काय करावे? तेव्हां गणपतीनं सांगितलं की, त्यानं संकष्टी चतुर्थी व्रत करावं, म्हणजे खोट्या आळातून त्याची मुक्तता होईल. गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहिल्यामुळे श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा खोटा आळ आला होता. तो आळ कृष्णाने ‘संकष्टी चतुर्थी व्रत’ केल्यामुळे गेला, अशी पौराणिक कथा आहे.
आबालवृद्ध स्त्रीपुरुषांनी सर्वांनी करावयाचे हे एक साधे, सोपे पण शीघ्र फ़लदायी व्रत आहे. श्रावण महिन्यातील संकष्टी चतुर्थी आणि मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी चतुर्थी विशेष फायदेशीर असते. चंद्राने तप करुन गणपतीला प्रसन्न करून घेतल्याने चंद्र दर्शनाचे महत्त्व आहे. प्रत्येकाने वर्षांतून या दोन संकष्टी तरी अवश्य कराव्या, असे शास्त्रात सांगितले आहे.
दरम्यान, भाद्रपद शुक्ल चतुर्थीला (गणेश चतुर्थी) चंद्र दर्शन झाल्यास खोटे आरोप होतात आणि नको ते संकट ओढवते, अशी पौराणिक कथा आहे. त्या कथेचा व संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्र बघून उपवास सोडण्याचा एक धार्मिक संबंध आहे. त्यामुळे शक्यतो उपवास करणाऱ्यांनी आणि न करणाऱ्यांनी चंद्रोदयानंतरच उपवास सोडावा. त्यामुळे उपवास फायदेशीर ठरतो.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: हिंदू परंपरेनुसार संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्र दर्शनानंतर सोडला जातो. चंद्राला अर्घ्य अर्पण करून गणपतीची प्रार्थना केल्यानंतर व्रत पूर्ण झाल्याचे मानले जाते.
Ans: धार्मिक मान्यतेनुसार चंद्र हा मन, शांती आणि भावनांचा कारक मानला जातो. चंद्रदर्शन केल्याने मानसिक शांतता मिळते आणि गणेशाची कृपा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे.
Ans: चंद्राला पाणी अर्पण करून त्याची पूजा केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी वाढते अशी धार्मिक श्रद्धा आहे.






