फोटो सौजन्य - Social Media
शिक्षणाचा हक्क (RTE) अधिनियम २००९ अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जात आहे. या प्रक्रियेअंतर्गत प्रतीक्षा यादी टप्पा क्रमांक २ मध्ये समाविष्ट ९५५ विद्यार्थ्यांसाठी ८ एप्रिल २०२५ रोजी प्रवेश फेरी सुरु करण्यात आली असून, ती १५ एप्रिल २०२५ पर्यंत चालणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएसद्वारे शाळा अलॉटमेंटची माहिती दिली जात आहे. मात्र, अनेकवेळा तांत्रिक अडचणींमुळे एसएमएस वेळेवर मिळत नाही. त्यामुळे पालकांनी केवळ एसएमएसवर विसंबून न राहता, RTE पोर्टलवरील ‘अर्जाची स्थिती’ या टॅबवर आपला अर्ज क्रमांक टाकून प्रवेश स्थिती तपासावी. तसेच वेळोवेळी पोर्टलवर दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.
प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पालक अलॉटमेंट लेटर, आधार कार्ड, राहण्याचा पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशा आवश्यक कागदपत्रांसह १५ एप्रिल २०२५ पर्यंत जवळच्या पडताळणी केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी. कागदपत्र पडताळणी झाल्यानंतरच विद्यार्थ्याचा प्रवेश अंतिम करण्यात येणार आहे. दिलेल्या वेळेत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास प्रवेश रद्द होण्याची शक्यता असल्यामुळे पालकांनी विशेष काळजी घ्यावी.
ठाणे जिल्ह्यातील पंचायत समिती व महानगरपालिका क्षेत्रांत एकूण ६२७ पात्र शाळा आहेत, ज्यामध्ये एकूण ११ हजार ३२० जागा मोफत शिक्षणासाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यामध्ये आतापर्यंत एकूण ७ हजार ९४५ विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या प्रवेश देण्यात आला आहे. शिल्लक राहिलेल्या जागांसाठी प्रतीक्षा यादी टप्पा २ अंतर्गत आणखी ९५५ विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे अजूनही अनेक पालक आणि विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची संधी उपलब्ध आहे.
शिक्षण विभागाकडून ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक, प्रभावी आणि न्याय्य पद्धतीने राबवण्यात येत आहे, जेणेकरून गरजू आणि पात्र लाभार्थ्यांना या शासकीय योजनेचा लाभ निश्चित मिळावा. त्यामुळे संबंधित पालकांनी वेळेचे भान ठेवून आवश्यक कागदपत्रांसह दाखल होऊन सर्व औपचारिकता पूर्ण कराव्यात. ही संधी गमावू नये यासाठी शिक्षण विभागाने वेळोवेळी मार्गदर्शन करत तसेच विविध माध्यमांतून माहिती देत पालकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हा हक्क ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पात्र विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, शिक्षणाच्या समान संधी सर्वांना मिळाव्यात, हाच या योजनामागचा प्रमुख उद्देश असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.