फोटो सौजन्य - Social Media
ठाणे येथील के. जी. जोशी कला आणि ना. गो. बेडकेर वाणिज्य महाविद्यालय येथे शुक्रवार, दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी डॉ. वासुदेव नारायण बेडेकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा उत्साहात पार पडली. गेल्या ११ वर्षांपासून सुरू असलेली ही स्पर्धा यंदा १२व्या वर्षात पदार्पण करत ऑनलाइन पद्धतीने आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ पत्रकार प्रशांत मोरे (महाराष्ट्र टाइम्स) आणि विशाल परदेशी (न्यूज 18 मराठी) यांनी केले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, उपप्राचार्य व समन्वयक डॉ. महेश पाटील, उपप्राचार्या प्रियंवदा टोकेकर, ग्रंथपाल नारायण बारसे तसेच प्रा. डॉ. विमुक्ता राजे उपस्थित होते. यंदाच्या स्पर्धेचा विषय ‘आजची पत्रकारिता लोकशाहीचा चौथा स्तंभ राहिली आहे का?’ असा होता. या विषयावर विद्यार्थ्यांनी अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही बाजूंनी प्रभावी मांडणी केली.
स्पर्धेत एकूण सहा संघांनी सहभाग नोंदविला होता. प्रत्येक संघातील दोन स्पर्धकांना प्रत्येकी सहा मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. एका स्पर्धकाने विषयाच्या समर्थनार्थ, तर दुसऱ्याने विरोधात आपले मत मांडले. सर्व स्पर्धकांनी सध्याच्या पत्रकारितेची स्थिती, सोशल मीडियाचा प्रभाव, निष्पक्षतेचा अभाव आणि लोकशाहीतील माध्यमांची भूमिका यावर सखोल आणि मुद्देसूद विचार मांडले.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रथम क्रमांकाच्या संघाला ५००० रुपये, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाला ३००० रुपये, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकाच्या संघाला २००० रुपये, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आली. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचा निकाल कार्यक्रम संपताच जाहीर करण्यात आला. प्रथम पारितोषिक अभय आळशी आणि यश पाटील (मुंबई विद्यापीठ, कालिना विद्यानगरी) यांनी पटकावले. द्वितीय क्रमांक तेजस्विनी थोरात आणि दिया झाटे (जीवनदीप महाविद्यालय, गोवेली) यांनी मिळवला. तर तृतीय क्रमांक अनुष्का बिराजदार आणि संस्कृती निकम (सर परशुरामभाऊ महाविद्यालय, पुणे) यांनी पटकावला.
स्पर्धेच्या शेवटी परीक्षकांनी सर्व स्पर्धकांना मार्गदर्शन करत त्यांच्या सादरीकरणातील बलस्थान आणि सुधारणा करण्याच्या बाबी सांगितल्या. त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन, विश्लेषण आणि तार्किक विचारशक्ती विकसित करण्याचा सल्ला दिला. तसेच भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
या संपूर्ण स्पर्धेचे संयोजन प्रा. डॉ. विमुक्ता राजे यांनी केले. सूत्रसंचालन पायल सागळे आणि संस्कृती चाफेल यांनी प्रभावीपणे पार पाडले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मान्यवर, स्पर्धक आणि आयोजकांचे आभार मानण्यात आले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.






