फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Strait of Hormuz India Oil Tanker: जगातील सर्वात महत्त्वाच्या सागरी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुज स्ट्रेटची (Strait of Hormuz) सध्या पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू आहे. अलीकडच्या काळात हा जलमार्ग बंद होण्याची भीती व्यक्त केली जात असतानाच भारतासाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. भारताचे तीन मोठे तेलवाहू जहाजे होर्मुज स्ट्रेट यशस्वीरित्या पार करून भारताच्या दिशेने पुढे सरकले आहेत. अशा परिस्थितीत, या मार्गावरून भारतात येणारे महाकाय तेल टँकर्स नेमके किती अंतर कापतात आणि या प्रवासात किती इंधन खर्च होते, असा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे. हा आकडा जाणून अनेकांना आश्चर्य वाटते.
होर्मुज स्ट्रेटपासून भारताच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंतचे अंतर बंदरांच्या हिशोबाने वेगवेगळे आहे. गुजरात, मुंबई, दाहेज आणि इतर प्रमुख पश्चिम बंदरांपर्यंत पोहोचण्यासाठी जहाजांना साधारणपणे १२०० ते १५०० सागरी मैल एवढा प्रवास करावा लागतो. हे अंतर सुमारे २२०० ते २८०० किलोमीटरच्या दरम्यान भरते. हाच सागरी मार्ग भारतासाठी सर्वात महत्त्वाचा ऊर्जा कॉरिडॉर मानला जातो.
देशात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाचा आणि एलएनजीचा मोठा वाटा याच मार्गाने येतो. जर या मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा आला, तर त्याचा थेट परिणाम जागतिक तेलाच्या किमतींवर आणि भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर होऊ शकतो.
होर्मुज स्ट्रेटपासून भारतापर्यंत येणाऱ्या मोठ्या ऑइल टँकर्सना सामान्यतः ४ ते ६ दिवसांचा वेळ लागतो. हा कालावधी हवामान, सागरी वाहतूक, जहाजाचा आकार आणि त्याचा वेग यावर अवलंबून असतो. इंधनाचा विचार केला तर, एक ‘व्हेरी लार्ज क्रूड करिअर’ (VLCC) किंवा सुपर टँकर दररोज सुमारे ५०,००० ते ८०,००० गॅलन सागरी इंधनाचा वापर करू शकतो. ही जहाजे एकाच वेळी २ लाख ते ३ लाख मेट्रिक टनांपर्यंत कच्चे तेल वाहून नेतात. याच कारणामुळे त्यांच्या इंधनाचा वापर कोणत्याही सामान्य वाहनाच्या तुलनेत हजारो पटीने जास्त असतो.
जर होर्मुज स्ट्रेटपासून भारतापर्यंतचा सरासरी प्रवास ५ दिवसांचा मानला, तर एक मोठा ऑइल टँकर संपूर्ण प्रवासात अंदाजे २.५ लाख ते ४ लाख गॅलन इंधन खर्च करू शकतो. अंतराच्या हिशोबाने पाहिले तर, हे जहाज प्रत्येक सागरी मैलाच्या प्रवासात सुमारे २०० ते २५० गॅलन इंधन जाळते. हा आकडा ऐकायला खूप मोठा वाटत असला, तरी या टँकर्सची क्षमताही तितकीच अवाढव्य असते. याच कारणास्तव, जहाजांच्या कंपन्या आपला वेग, मार्ग अशा प्रकारे निश्चित करतात, जेणेकरून इंधनाची बचत होईल. होर्मुज ते भारत हा प्रवास केवळ तेलाची वाहतूक नाही, तर जागतिक ऊर्जा पुरवठ्याचा एक महत्त्वाचा दुवा आहे, ज्यावर कोट्यवधी लोकांच्या ऊर्जेच्या गरजा अवलंबून आहेत.






