फोटो सौजन्य - Social Media
साधारणपणे Pink Tax म्हटलं की महिलांना पुरुषांपेक्षा जास्त किंमत मोजावी लागणाऱ्या वस्तूंची आठवण होते, जसे रेजर, परफ्यूम किंवा कपडे. पण आता हा “पिंक टॅक्स” केवळ बाजारातच नाही तर थेट ऑफिस, करिअर आणि पगारावरही परिणाम करू लागला आहे. यालाच तज्ज्ञ Career Pink Tax असे म्हणतात. हा प्रत्यक्ष कर नसला तरी महिलांना त्यांच्या प्रगती, वेळ आणि मानसिक शांततेच्या रूपाने रोज मोजावा लागणारा अदृश्य खर्च आहे.
महिलांच्या करिअरमध्ये अनेकदा लग्न, कुटुंब किंवा मातृत्वामुळे काही काळ ब्रेक घ्यावा लागतो. मात्र खरा प्रश्न तेव्हा निर्माण होतो जेव्हा त्या पुन्हा कामावर परत येतात. अनेक अहवालांनुसार करिअर ब्रेकनंतर परतणाऱ्या महिलांना अनेकदा २० ते २५ टक्के कमी पगाराची ऑफर दिली जाते. या परिस्थितीला Motherhood Penalty असे म्हटले जाते. म्हणजे मातृत्वामुळे त्यांच्या करिअरची गती कमी होते, तर त्याच काळात पुरुष सहकारी सतत काम करत असल्यामुळे पुढे निघून जातात.
करिअर पिंक टॅक्सचा आणखी एक मोठा भाग म्हणजे नेटवर्किंग. कॉर्पोरेट जगतात एक म्हण प्रसिद्ध आहे—“तुम्हाला काय माहित आहे यापेक्षा तुम्ही कोणाला ओळखता हे महत्त्वाचे असते.” अनेकदा मोठे प्रोजेक्ट किंवा प्रमोशन ऑफिसनंतर होणाऱ्या मीटिंग्स, पार्टी किंवा अनौपचारिक भेटींमध्ये ठरतात. पण घरच्या जबाबदाऱ्या किंवा सामाजिक कारणांमुळे अनेक महिला अशा कार्यक्रमांना उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे त्या अनेक संधींपासून दूर राहतात. याशिवाय महिलांवर ‘वेल-ग्रूम्ड’ दिसण्याचा सामाजिक दबावही जास्त असतो. पुरुष साध्या शर्ट-पँटमध्येही प्रोफेशनल मानले जातात, पण महिलांकडून मेकअप, हेअरस्टाइल आणि व्यवस्थित पोशाखाची अपेक्षा केली जाते. या सर्वासाठी लागणारा वेळ, पैसा आणि मानसिक ऊर्जा हा देखील एक प्रकारचा पिंक टॅक्सच आहे.
तज्ज्ञांच्या मते हा करिअर पिंक टॅक्स कमी करण्यासाठी कंपन्यांनी धोरणांमध्ये बदल करणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे समान कामासाठी समान वेतन म्हणजेच Equal Pay धोरण कठोरपणे लागू करणे. तसेच करिअर ब्रेकनंतर कामावर परतणाऱ्या महिलांसाठी विशेष प्रशिक्षण आणि संधी देणारे Returnship Program सुरू करणेही गरजेचे आहे. त्याचबरोबर हायब्रिड वर्क आणि फ्लेक्सिबल वर्किंग अवर्ससारख्या व्यवस्था वाढवल्या तर कामाचे मोजमाप केवळ ऑफिसमध्ये घालवलेल्या वेळेवर नव्हे तर परिणामांवर होईल. अशा धोरणांमुळे महिलांना करिअर आणि कुटुंब यामध्ये संतुलन राखणे अधिक सोपे होईल. शेवटी करिअर पिंक टॅक्स हा केवळ महिलांचा मुद्दा नसून कार्यस्थळावरील समान संधी आणि न्यायाचा प्रश्न आहे.






