भाविकांसाठी मढी देवस्थान सज्ज!
संदीप शेवाळे/ पाथर्डी: श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज यात्रा महोत्सवाचा मुख्य दिवस असून लाखो भाविकांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन व देवस्थान ट्रस्टने व्यापक आणि सर्वांगीण नियोजन केले आहे. सुरक्षा, वाहतूक, स्वच्छता आणि भाविकांच्या सोयीसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
नवीन विश्वस्त मंडळाची निवड जानेवारी महिन्यात झाल्यानंतर अवध्या एका महिन्यात प्रलंबित कामे मार्गी लावून यात्रेचे नियोजन करण्यात आले. वाढत्या भाविक संख्येचा विचार करून सुरक्षेला विशेष प्राधान्य देण्यात आले आहे. मंदिर परिसरात सध्या ७२ सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून पोलिस प्रशासनासाठी स्वतंत्र ३२ कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन ड्रोन कॅमेरे तैनात केले आहेत. अग्निसुरक्षेसाठी अग्निशमन गाडी आणि ४० फायर एक्सटिंग्विशर उपलब्ध ठेवले आहेत.
आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णवाहिका आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध राहणार आहे. यात्रा कालावधीत पोलिस, आरोग्य, महावितरण, अग्निशमन, स्वयंसेवक, भाविकांसाठी महाप्रसादाचे नियोजन केले आहे. तसेच २० हजार चौरस फूटांचा हॉल, स्वतंत्र जेवणगृह, स्वयंपाकगृह,
निवारा हॉल, स्वच्छतागृहे आणि पक्की पार्किंग व्यवस्था केली आहे. १३ खोल्यांचा भक्तनिवासही भाविक व स्वयंसेवकांसाठी खुला ठेवला आहे. वाढती गर्दी लक्षात घेता ११ ते १७ मार्च या कालावधीत मुक्तद्वार दर्शनाची सुविधा आहे. १८ मार्चला फुलबाग यात्रेदिवशी समाधी मंदिरात केवळ कावडधारकांना प्रवेश दिला जाणार आहे. ट्रस्टच्या नावाखाली होणाऱ्या अनधिकृत वसुलीपासून सावध राहण्याचे आणि नाथ पालख्या व निशाण मिरवणुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन देवस्थानतर्फे केले आहे.
यात्रोत्सव सुरळीत होण्यासाठी देवस्थान अध्यक्ष विठ्ठल मरकड, उपाध्यक्ष सुरसिंगराव पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पवार, व्यवस्थापक संजय मरकड, सर्व विश्वस्त परिश्रम घेत आहेत.
वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत. निवडूंगा मार्ग येण्यासाठी, तिसगाव मार्ग बाहेर जाण्यासाठी, पाथर्डी-धामणगाव-मढी मार्ग दुहेरी वाहतूक, मायंबा घाट मार्ग केवळ दुचाकी वाहनांसाठी ठेवण्यात आला आहे. एसटी स्टैंड धामणगाव रस्त्यालगत हलविले आहे.






