आजपासून जिल्ह्यात जल महोत्सवाला सुरुवात!
अहिल्यानगर मधील ग्रामीण पाणी पुरवठा यंत्रणा अधिक शाश्वत व मजबूत करण्यासाठी आणि सामुदायिक सहभाग वाढवण्यासाठी ८ मार्च ते २२ मार्चपर्यंत जिल्हयात सर्वं ग्रामपंचायत स्तरावर ‘जल महोत्सव’ राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी दिली. भंडारी म्हणाले, नदी उत्सवाच्या धर्तीवर जल उत्सवाची परंपरा विकसित करण्याच्या गरजेवर भर दिला होता.
या दृष्टिकोनावर आधारित, राष्ट्रीय पेयजल विभाग, केंद्र शासन व नीती आयोगाच्या सहकार्याने २०२४ मध्ये २० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये जल उत्सव प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आला होता. आता जल महोत्सव देशभर राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन गुणवत्तापूर्ण पाणी पुरवठा करणे हे जल जीवन मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरू असलेल्या योजना, स्टैंड पोस्ट नळ पाणीपुरवठा योजना तसेच दरडोई किमान ४० लिटर प्रतिदिनने पूर्ण झालेल्या योजनांची दरडोई किमान ५५ लिटर प्रतिदिन प्रमाणे सुधारणात्मक पुनर्जोडणी करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या, अनुदानित आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहांसाठी या योजनेतून नळजोडणी देण्यात येत आहे. एकाकी/आदिवासी वाडी-पाड्यांसाठी सौरऊर्जा आधारित नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात येत आहेत. जल महोत्सव जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत अशा तीन स्तरांवर होणार आहे. गाव आणि पंचायत समिती स्तरावर ‘लोकजल उत्सव’ आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारित असेल.
गावात ग्रामसभा आणि पाणी समितीद्वारे प्रत्यक्ष कृतींवर भर
महिलांद्वारे जल गुणवत्ता चाचणी (फिल्ड टेस्टिंग किट वापरून)
लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा गावातील जलस्रोतांच्या सरक्षणासाठी पुढाकार
जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि स्वच्छता
पाणी पुरवठा योजनांचे औपचारिक हस्तांतर आणि सामुदायिक शपथ
ग्रामपंचायत विकास आराखड्यात पाण्याचा समावेश
गाव, पंचायत समिती स्तरावर लोक जल उत्सव आयोजित केला जाईल, जो पूर्णपणे लोकसहभागावर आधारीत असेल, पिण्याच्या पाण्याला सांस्कृतिक आणि सामाजिक प्राधान्य देणे, स्थानिक जलउत्सव संस्थांत्मक करण्यासाठी प्रोत्साहित करणे, राज्य ते गावस्तरापर्यंत विविध विभागांमध्ये समन्वय साधणे, पाणी गुणवत्ता, सौर ऊर्जा आणि देखभाल दुरूस्तीसाठी दिर्घकालीन आराखडा तयार करणे, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणाला जलसेवेशी जोडणे हा जलमहोत्सवाच्या उपक्रमामागचा उद्देश असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हितेंद्र चव्हाण यांनी सांगितले.






