फोटो सौजन्य - Social Media
NDA ने उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची घोषणा केली आहे. येत्या ९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत ते NDA तर्फे अधिकृत उमेदवार असतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, NDA सहकाऱ्यांशी व्यापक चर्चा करून आणि विरोधी पक्षांच्या भूमिकेची कल्पना घेतल्यानंतर राधाकृष्णन यांच्या नावावर एकमत झाले आहे.
राधाकृष्णन हे तामिळनाडूमधील अनुभवी व ज्येष्ठ नेते असून त्यांनी भाजपमध्ये दीर्घकाळ विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. कोयंबटूर मतदारसंघातून ते दोनवेळा लोकसभेसाठी निवडून गेले. २००४ ते २००७ दरम्यान ते तमिळनाडू भाजपचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी तब्बल १९ हजार किलोमीटर प्रवास करत ९३ दिवसांची रथयात्रा आयोजित केली. या यात्रेमुळे भाजपचा जनाधार तामिळनाडूमध्ये अधिक मजबूत झाला. संसदेत त्यांनी वस्त्रोद्योग समितीचे अध्यक्षपद, तसेच वित्त आणि सार्वजनिक उपक्रम समित्यांचे सदस्य म्हणून काम केले. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी संयुक्त राष्ट्र महासभा आणि तैवानमधील भारतीय प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणूनही भारताचे प्रतिनिधित्व केले.
प्रशासकीय क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. २०१६ ते २०२० दरम्यान कोयर बोर्डचे अध्यक्ष म्हणून त्यांनी विक्रमी २,५३२ कोटी रुपयांच्या निर्यातीचा टप्पा गाठला. २०२० ते २०२२ या काळात ते भाजपचे केरळ प्रभारी होते. २०२३ मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. अवघ्या चार महिन्यांत त्यांनी राज्यातील सर्व २४ जिल्ह्यांना भेट देऊन थेट नागरिक आणि प्रशासनाशी संवाद साधला. जुलै २०२४ मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले. त्याआधी त्यांच्याकडे तेलंगणाचे अतिरिक्त राज्यपालपद आणि पुद्दुचेरीचे उपराज्यपालपदही होते.
नक्की किती झाले आहे CP राधाकृष्णन यांचे शिक्षण?
सी. पी. राधाकृष्णन यांची शैक्षणिक पार्श्वभूमी अत्यंत भक्कम आहे. त्यांनी तामिळनाडूमधील V. O. चिदंबरम कॉलेज येथे शिक्षण घेतले आणि बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) पदवी प्राप्त केली. हे महाविद्यालय मदुराई विद्यापीठाशी संलग्न आहे. व्यवसाय प्रशासनाच्या शिक्षणामुळे त्यांच्यात व्यवस्थापन, धोरण आखणी आणि संघटनकौशल्य विकसित झाले. या शिक्षणाचा उपयोग त्यांनी राजकीय व प्रशासकीय कारकिर्दीत मोठ्या प्रमाणात केला. कोयर बोर्डच्या अध्यक्षपदावर असताना निर्यातीतील विक्रमी वाढ किंवा राज्यपाल म्हणून प्रशासनाशी प्रभावी संवाद साधणे, ही त्यांची कार्यशैली या शिक्षणाच्या बळावरच घडली.