worli hit and run
Worli Hit and run: मुंबई BMW हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शाह याला आज मंगळवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मिहीर शाहने चालविलेल्या बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्याने वरळी येथील ४० वर्षीय कावेरी नाखवांचा मृत्यू झाला, ही घटना ७ जुलै रोजी पहाटे ५.३० च्या सुमारास वरळीच्या धमनी अन्नी बेझंट रोड येथे घडली.
बीएमडब्ल्यू हिट अँड रनच्या घटनेनंतर मिहिर शाह हा फरार झाला होता. दोन दिवसांनंतर पालघर जिल्ह्यातील विरार येथून त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला मुख्य महानगर दंडाधिकारी (शिवडी न्यायालय) एस पी भोसले यांच्यासमोर हजर करण्यात आले. त्यांनी त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज मंगळवार, १६ जुलै रोजी न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे ३० जुलैपर्यंत मिहिर न्यायालयीन कोठडीत असणार आहे.
अपघात प्रकरण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कावेरी नाखवाला भरधाव कारने सुमारे 1.5 किमीपर्यंत खेचले होते. त्यानंतर मिहीरने त्याचा ड्रायव्हर राजऋषी बिडावतसोबत जागा बदलली आणि तो दुसऱ्या वाहनात पळून गेला.मिहीर शाहवर भारतीय न्याय संहिता कलम १०५ सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. मिहीरचे वडील राजेश शहा हे पालघर जिल्ह्यातील शिवसेनेा शिंदे गटाचे कार्यकर्ते होते. त्यांनी अपघातानंतर मिहिरला मदत करण्याचे प्रयत्न केले होते. अपघातानंतर आरोपी मुलाला मदत केल्याप्रकरणी राजेश शहाला अटक करण्यात आली होती. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर त्यांच्यावर शिवसेनेने कारवाई करत त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदावरूनही हकालपट्टी केली. या घटनेनंतर चालक राजऋषी बिडावतलाही अटक करण्यात आली . न्यायालयाने ११ जुलै रोजी त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.