बदलापूरनंतर पालघरमध्ये पुन्हा एकदा मन सुन्न करणारी घटना, शाळेत 7 वर्षीय चिमुरडीवर 5 वेळा लैंगिक अत्याचार
बदलापूरच्या शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहे. बदलापुरात काही दिवसांपूर्वी दोन चिमुकल्या मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानतंर मंगळवारी नाशिकमध्ये एका साडे चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. त्यानंतर आता पालघरमधील नायगावच्या अवर लेडी ऑफ वेलंकनी शाळेतील ७ वर्षीय बालिकेवर शाळेच्या कॅन्टीनमध्ये काम करणाऱ्या १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाने ४-५ वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.विशेष म्हणजे शाळेने हे प्रकरण न दडवता पोलिसांकडे तक्रार केली.
पीडित बालिका या शाळेत दुसर्या इयत्तेत शिक्षण घेत आहे. कॅन्टीन मध्ये जाण्यास तिने नकार दिल्यावर सदर प्रकार उघड झाला.कॅंटीनमध्ये काम करणारा अंकल मला त्रास देतो असे तिने सांगितल्यानतंर हा प्रकार शिक्षिकेने मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांना सांगितला. त्यांनी लगेच या मुलीची विचारपूस केल्यावर कॅंटीनमध्ये काम करणारा मुलगा लैंगिक अत्याचार करत असल्याचे तिने सांगितले.
सदर चार घॄणास्पद अत्याचार तिने आपल्या घरीही सांगितला होता. मात्र पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. मुख्याध्यापक मेल्विन सिक्वेरा यांनी त्वरीत याबाबतची माहिती नायगाव पोलिसांना दिली. या प्रकरणाची माहिती मिळताच आरोपी मुलाला पोक्सोच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली.तो विधीसंघर्षग्रस्त असल्याची अशी माहिती नायगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.
आरोपी दोनच महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशातून काम करण्यासाठी आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. अन्य मुलींसोबत असा प्रकार घडला का त्याचा देखील पोलीस तपास करत आहेत. मुलीचे पालक तक्रार देण्यासाठी तयार नव्हते. मात्र मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी हा प्रकार दडवून न ठेवता पोलिसांना माहिती दिली.