रेल्वेखाली ढकलून महिलेची हत्या
मुंबई : मुंबईतील दिवा रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. रेल्वेतील एका अनोळखी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र, ती महिला प्रतिसाद देत नाही म्हणून या माथेफिरूने तिला थेट रेल्वेखाली ढकलून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजन शिवनारायण सिंग याला अटक केली आहे.
आरोपी राजन आणि ती अनोळखी महिला यांच्यात बराच वेळ या ठिकाणी वादविवाद सुरू होता, अशी माहिती येथील सफाई कर्मचाऱ्यांनी दिली. १८ जुलै रोजी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान या गुन्ह्यातील फिर्यादी तुळसीदास हेमा कामडी (विहीगाव, कसारा), हे दिवा रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक ७-८ वर सफाईचे काम करत होते. त्यावेळी फलाट क्रमांक ५-६ वरुन आरडाओरडा करण्याचा आवाज आला. त्यामुळे यातील फिर्यादी कर्मचारी आणि त्याच्यासह असलेल्या दुसऱ्या एक सफाई कामगाराने हा प्रकार पाहिला.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न; सासू-सूनेचा मृत्यू तर…
यावेळी यातील आरोपी राजन शिवनारायण सिंग (दिवा) याचा एका महिलेसोबत वादविवाद चालू होता. यातील अटकेतील आरोपी हा त्या महिलेच्या सोबत कल्याण बाजूकडे चालत जाऊन तिचा पाठलाग करुन जवळीक करत होता. त्यावरुन त्यांच्यामध्ये वाद-विवाद चालू होता. त्यानंतर आरोपीने या महिलेला दोन्ही हातांनी गळ्याभोवती समोरुन पकडले होते. त्यामुळे ही महिला त्या व्यक्तीच्या तावडीतून सुटण्यासाठी प्रतिकार करत होती.
मालगाडी आली अन्…
त्यानंतर एक मालगाडी तेथून जात असताना आरोपीने तिला या गाडीच्या खाली ढकलले. त्यानंतर तिची हत्या करून तो रेल्वे ट्रॅकमधून चालत जात होता. त्यावेळी त्याला दिवा रेल्वे स्टेशन येथील ड्युटीवरील पोलिसांनी ताब्यात घेतले. आरोपीला आता न्यायालयाने ५ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यात सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. नांगोळे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू आणि सुनेचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सांगलीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.