...अन् बालविवाहाचे फुटले बिंग (File Photo)
अमरावती : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना आता अमरावतीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यादरम्यान सदर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर याप्रकरणाचे बिंग फुटले.
शिरजगाव कसबा पोलिस ठाण्यात याप्रकरणी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची तक्रार सरपंचाने पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. आरोग्य उपकेंद्र आणि ग्रामपंचायत कार्यालयात अल्पवयीन गर्भवती मुलीच्या बालविवाहाची तक्रार प्राप्त झाली. त्याआधारे, ग्राम विकास अधिकारी, आशासेविका आणि तक्रारदार सरपंच हे २० ऑगस्ट रोजी पीडितेच्या घरी गेले. परंतु पीडित आणि आरोपी बाहेर गावी गेल्यामुळे भेटू शकले नाहीत.
यानंतर मंगळवारी (दि. २६) सरपंचांना माहिती मिळाली, पीडित आणि आरोपी घरी आहेत. त्यावेळी सरपंच, ग्राम विकास अधिकारी आणि आशासेविका त्यांच्या घरी गेले आणि पीडितेला भेटले. त्यावेळी त्यांनी पीडितेची विचारपूस केली असता तिने सर्वकाही सांगितले.
हेदेखील वाचा : Chhatrapati Sambhajinagar: जन्मदेताच अवघ्या दोन तासात बाळाला गोणीत गुंडाळून कचऱ्यात फेकलं, अर्भकाला कुत्र्यांनी घेरलं आणि थेट…
दरम्यान, आमचे लग्न ८ ते ९ महिन्यांपूर्वी झाले होते. त्यानंतर पतीसोबत शारीरिक संबंध ठेवल्याने ती सहा महिन्यांची गर्भवती राहिल्याचे तिने सांगितले. त्यानंतर या प्रकरणात सरपंचाच्या तक्रारीवरून शिरजगाव कसबा पोलिसांनी पीडितेच्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
महिलांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ
गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय आहेत. असे असताना काही दिवसांपूर्वी, भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे शहर पोलिसांच्या हद्दीत मोडणाऱ्या गावात अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर सातत्याने अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याच अत्याचारातून पीडित मुलगी 6 महिन्यांची गर्भवती राहिल्याचे उघडकीस आले होते.