मित्राला वाचवायला गेलेल्या तरुणावर चाकूने हल्ला; धक्कादायक कारण समोर...
चंद्रपूर : शहरात प्रेमप्रकरणातून दोन तरुण मिळून एका तरुणाला मारहाण करत होते. यामध्ये मित्राला वाचवण्यासाठी आलेल्या तरुणावर दोघांनी चाकूने वार केला. त्यामुळे भांडण सोडवायला गेलेला तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना शहरातील वन अकॅडमीसमोरील भागात बुधवारी (दि. 25) घडली. रामनगर पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे.
अंश ऊर्फ अनीस पंढरीनाथ वालकोंडे व आर्यन संतोष रामटेके (रा. बाबुपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. तर श्रेयश दामोधर पिल्लारे (वय 23, रा. इंदिरानगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. बुधवारी शहरातील वन अकॅडमीसमोरील भागात अंश वालकोंडे व आर्यन रामटेके हे एका तरुणाला मारहाण करत होते. तेवढ्यात मित्राला वाचविण्याकरिता मध्ये आलेल्या श्रेयश पिल्लारे याने दोघांना बाजूला सारले. मात्र, श्रेयश मध्ये का आला म्हणून दोघांनी त्याच्यावर चाकूने वार केले.
या हल्ल्यात श्रेयशच्या हाताला गंभीर दुखापत झाली. ते दोघे इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी पुन्हा चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही तरुणांनी दोघांना पकडत बाजूला केले. नागरिकांनी अंश व आर्यनला पकडून ठेवत रामनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अंश व आर्यनला ताब्यात घेत जखमी श्रेयशला तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.
प्रेम प्रकरणाच्या वादातून हल्ला
सदर हल्ला हा प्रेम प्रकरणाच्या वादातून झाला अशी माहिती पुढे आली आहे. रामनगर पोलिसांनी अंश वालकोंडे व आर्यन रामटेके यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस निरीक्षक आसिफराज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.