वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; सात लाखांसाठी गर्भवती महिलेचा छळ, अखेर गळफास घेऊन आत्महत्या (File Photo : Suicide)
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारखे प्रकार होत आहे. असे असताना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आले आहे. पैशांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. याच छळाला कंटाळून गरोदर असलेल्या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
आएशा बेगम अरबाज शेख (वय २३ रा. अजिंठा हल्ली मुक्काम हसूल संभाजीनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. आएशाला माहेरहून फूट व्यवसायासाठी सात लाख रुपये आणण्यासाठी तगादा लावत सतत मारहाण करून मानसिक त्रास दिला जात होता. हा त्रास पती व सासरच्या मंडळींकडून दिला जात होता. अखेर याला कंटाळून विवाहितेने पाच महिन्यांची गरोदर असताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना हर्सल येथे घडली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधील उल्लेखावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
आत्महत्या करणाऱ्या विवाहितेचे नाव आएशा असून, सदरील आत्महत्येप्रकरणी विवाहितेची आई नूरजहाँ बेगम शेख रशीद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आएशाचा पती अरबाज सलिम शेख सासू सायरा सलिम शेख, जेठ अलिम सलिम शेख (सर्व रा. किदवई नगर, नायगांव रोड, भिवंडी, जि.ठाणे) यांच्याविरुद्ध हर्सल पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
काय म्हटले तक्रारीत?
मृत आएशाच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुलीचे लग्न तीन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये मुस्लिम रितीरिवाजाप्रमाणे शेख अरबाज सलिम याच्याशी झाले. लग्नानंतर त्यांना एक दीड वर्षांचा मुलगा देखील आहे. पती व सासरची मंडळी माझ्या मुलीस सतत मारहाण व पैशाची मागणी करत होते.
सासरकडून पैशासाठी छळ
मी व माझ्या पतीने तसेच माझ्या भावाने वरील आरोपीस या प्रकरणी समजूत घालण्याचा भरपूर प्रयत्न केला. काही दिवस त्यांनी माझ्या मुलीस चांगले वागवले. मात्र, पुन्हा तिला त्रास देण्यास सुरुवात करून पैशांची मागणी लावून धरली. मात्र, आमची परिस्थिती गरिबीची असल्याने आम्ही पैशाची पूर्तता करू शकलो नाही.
मुलीला पाठवून दिले माहेरी
मागील महिन्यात जावयाने मुलीस माहेरी पाठवून दिले. त्यामुळे मुलगी सतत तणावात राहत होती. ती पाच महिन्यांची गरोदर असताना माझ्या मुलीने या सततच्या मानसिक शारीरिक छळाला कंटाळून २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री आत्महत्या केली असून, आत्महत्येपूर्वी तिने सुसाईड नोटही लिहिली. त्यात आत्महत्येस पती आणि सासरचे कुटुंबीय छळ करत होते असा उल्लेख केला आहे.
हेदेखील वाचा : Nagpur Crime: दारूच्या नशेत शेजाऱ्याचा हैवानपणा! किरकोळ वादातून माय-लेकीची लाकडी दांड्याने निर्घृण हत्या






