संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारी वाढली असून, पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वैमनस्यातून टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना हडपसरमधील शिंदे वस्तीत घडली आहे. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी टोळक्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
काकासाहेब शिरोळे (वय ४६, रा. कसबा पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेश बागुल याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळे यांनी याबाबत हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, ऋषीकेश बागुल आणि काकासाहेब शिरोळे यांच्यात वाद झाले होते. शिंदे वस्ती एसआरए वसाहत परिसरात ४ जुलै रोजी शिरोळे आले होते. त्या वेळी बागुलने साथीदारांना बोलावून घेतले. बागुल आणि साथीदारांनी शिरोळे यांना बेदम मारहाण केली. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. तसेच दांडक्याने मारहाण केली. पसार झालेल्या चोरट्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक तपास करत आहेत.
हे सुद्धा वाचा : देवेंद्र फडणवीसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा; हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
कुरुंदवाडमध्ये तरुणाचा खून
कुरुंदवाड येथील मजरेवाडी रस्त्यावर रविवारी रात्री घडलेल्या प्रकाराने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अक्षय दीपक चव्हाण (वय २६, रा. कुरुंदवाड) या तरुणावर अज्ञात तिन आरोपींनी धारदार शस्त्राने गंभीर हल्ला करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद कुरुंदवाड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तातडीने तीन विशेष पोलिस पथकांची नियुक्ती केली आहे. ही घटना रविवारी रात्री साडेअकरा ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात घडली आहे.