संग्रहित फोटो
लातूर : लातूर शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये धारदार शस्त्रांचा वापर वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. महात्मा बसवेश्वर महाविद्यालयासमोर एका तरुणाला बोलावून घेत त्याच्यावर कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज उमाकांत कोरे हे आपल्या मुलासह ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महात्मा बसवेश्वर महाविद्यालयासमोर गेले होते. त्यापूर्वी एका तरुणाने फोन करून त्यांना सायंकाळी साडेसहा वाजता महाविद्यालयासमोर येण्यास सांगितले होते. त्यानुसार कोरे हे मुलासह तेथे पोहोचले. दरम्यान, एमएच-२४-एटी-३०१५ क्रमांकाच्या ऑटोरिक्षातून चौघेजण तेथे आले. त्यांनी पंकज कोरे यांच्याशी वाद घालत त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. याचवेळी आरोपींपैकी एकाने कोयत्याने त्यांच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात कोरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. इतर आरोपींनी रॉड तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पंकज कोरे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. या प्रकरणी पंकज कोरे यांच्या फिर्यादीवरून गांधी चौक पोलिस ठाण्यात दीपक हिंगमिरे, विकास हिंगमिरे, विशाल हिंगमिरे आणि बाबुराव हिंगमिरे (सर्व रा. गवळी गल्ली, लातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गांधी चौक पोलिसांकडून करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : तिकोना गडाचा इतिहास आता क्यूआर कोडवर; पर्यटकांना मिळणार ऑडिओ स्वरूपात माहिती
भवानी पेठेत किरकोळ वादातून तरुणाची हत्या
भवानी पेठ परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाच्या डोक्यात सिमेंटचा पेपर ब्लॉक घालून त्याची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला अटक केली आहे. आकाश उर्फ अक्या विठ्ठल पाटोळे (वय २९, रा. काशेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी अजय उर्फ चोर राजा सुखदेव शिंदे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत मृत आकाश याच्या वहिणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.






