मुंबई काँग्रेसची जंबो कार्यकारणी जाहीर (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मंगळवारी रात्री जम्बो मुंबई काँग्रेसच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेस समितीने महाराष्ट्र काँग्रेसपाठोपाठ ही घोषणा करण्यात आली असून आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता ही घोषणा महत्त्वाची राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानण्यात येते आहे. यावेळी Political Affair Committee सोबतच मुंबई काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या पदांची घोषणा करण्यात आली असून यात कोषाध्यक्ष, वरीष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सचिव आणि इतर महत्त्वाच्या पदांचा समावेश आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Political Affair Committee चे अध्यक्षपद मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.
प्रसिद्धीपत्रकातून केले जाहीर
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार, पक्षाचे महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी या समितीच्या नावांची घोषणा प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून मंगळवारी रात्री उशीरा केली आहे. याशिवाय Political Affair Committee मध्ये १५ जणांच्या नावाचा समावेश असून पक्षाच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्यासह खासदार चंद्रकांत हंडोरे, आमदार ज्योती गायकवाड, आमदार अमीन पटेल, माजी मंत्री अस्लम शेख, आमदार भाई जगताप, चरणसिंह सप्रा या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
अस्लम शेख यांच्याकडे तिजोरीची जबाबदारी
मुंबई काँग्रेसच्या कोषाध्यक्षपदाची अर्थात सर्वात महत्त्वाची तिजोरीची जबाबदारी ही काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आणि मुंबईतील अल्पसंख्यांक समाजाचे नेते अस्लम शेख यांच्याकडे सोपविण्यात आली असून पक्षाने जाहीर केलेल्या वरीष्ठ उपाध्यक्षपदी आमदार अमीन पटेल, अशोक जाधव, जेमेन डिसुझा, शिवाजी सिंह या चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
याशिवाय उपाध्यक्षपदी एकूण ३४ जणांना संधी देण्यात आली असून यामध्ये अनेक नावांचा समावेश आहे, ज्यात ज्योती गायकवाड, भूषण पाटील, कालू बुधेलिया, मोहसीन हैदर यासारख्या पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. याशिवाय सचिवपदासाठी ७८ आणि कार्यकारिणी सदस्यांसाठी २० नावांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रमुख प्रवक्तेपदी सचिन सावंत
काँग्रेसने जाहीर केलेल्या या Political Affair Committee मध्ये मुंबई काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची मुंबई काँग्रेसच्या मुख्य प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली. त्याशिवाय इतर ५ प्रवक्त्यांची घोषणा यावेळी करण्यात आली, ज्यामध्ये माजी नगरसेवक शीतल म्हात्रे, आनंद शुक्ला, शकील चौधरी, सुरेशचंद्र राजहंस आणि सय्यद हुसैन यांचा समावेश आहे.
नरीमन पाईंटलाच पक्षाला नवीन कार्यालय बांधून द्या, अन्यथा…; काँग्रेसचा इशारा
जिल्हाध्यक्षपदावरही झाली नियुक्ती
काँग्रेसने आज जाहीर केलेल्या या कार्यकारणी यादीमध्ये ६ जिल्हाध्यक्षांचीही घोषणा केली आहे. यामध्ये दक्षिण मुंबईमध्ये रवी बावकर यांच्यावर ही जबाबदारी सोपविली असून दक्षिण मध्य मुंबईची जबाबदारी कचरू यादव आणि उत्तर मध्यची जबाबदारी अर्शद आझमी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याशिवाय उत्तर मुंबईची जबाबदारी राजपात यादव आणि उत्तर पूर्व भागाची जबाबदारी केतन शाह, उत्तर पश्चिमसाठी भावना जैन यांच्यावर सोपविण्यात आली आहे.