संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात गन्हेगारी वाढली असून, गुन्हेगारांच्या टोळ्या सतत धुडगूस घालत असल्याचे दिसून येत आहे. खून, मारामाऱ्या, दरोडे यासारख्या घटनांनी पुणेकर नागरिकांमधिये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातील लोहगाव भागातून एक घटना समोर आली आहे लोहगाव भागात वैमनस्यातून टोळक्याने एकावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
भाऊसाहेब गोपीनाथ राखपसरे (वय ४८, रा. मोझे आळी, लोहगाव) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. खुनाचा प्र्रयत्न केल्याप्रकरणी नितीन सकट, निकेश पाटील, गणेश सखाराम राखपसरे, ओंकार उर्फ खंड्या खांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाऊसाहेब राखपसरे यांची आरोपींशी भांडणे झाली होती. राखपसरे यांनी दिलेल्या तक्रारीमुळे आरोपींविरुद्ध पोलिसांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केली होती. या कारणावरुन नितीन, निकेश, गणेश, ओंकार आणि साथीदार चिडले होते. आरोपींनी १३ ऑगस्ट राेजी रात्री साडेअकराच्या सुमारास त्यांच्यावर लोहगाव भागात हल्ला केला. त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार करुन आरोपी पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सचिन धामणे अधिक तपास करत आहेत. पसार झालेल्या आरोपींचा माग काढण्यात येत आहे. पुणे शहरात किरकोळ वादातून खुनाचा प्रयत्न, खून अशा घटना वाढत आहेत. किरकोळ वादातून कात्रज भागात एका तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली होती.
वारजे माळवाडीत रिक्षा चालकाची आजोबांना मारहाण
वारजे माळवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वंयस्फुर्त वाहतूकीचे नियमन करणाऱ्या एका आजोबांना रिक्षा चालकाने किरकोळ कारणावरून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘बस थांब्यावर रिक्षा उभी करू नये. थोडी बाजूला घ्या,’ असे सांगितल्याच्या रागातून संतप्त रिक्षाचालकाने ही मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे. वारजे माळवाडी बस स्थानक परिसरात ही घटना घडली आहे. श्रीकांत किशनराव कुलकर्णी (वय ६५) असे मारहाण झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. ते यात जखमी झाले आहेत. कुलकर्णी त्यांच्या मोकळ्या वेळेत वाहतूक नियंत्रणाचे काम करतात. तसेच, वाहतूक पोलिसांना सहकार्य करत असतात. श्रीकांत कुलकर्णी वारजे माळवाडीतील रहिवासी आहेत. गणपती माथा चौक, डेक्कन बस स्थानक आणि सह्याद्री नॅशनल स्कूल परिसरात स्वखुशीने वाहतूक नियमनासाठी पोलिसांना सहकार्य करतात. गेल्या काही वर्षांपासून त्यांचा नित्याचा उपक्रम आहे. कुलकर्णी यांची नुकतीच एक शस्त्रक्रीया झाली आहे. त्या उपचारासाठी ते लवळे येथील रुग्णालयात चालले होते. त्यावेळी रिक्षावाल्याने त्यांच्यावर हल्ला केला आहे.